*कोकण Express*
*कुंभार समाज बांधवांच्या मेळाव्याचे सतीश दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कुंभार समाजाची लोकसंख्या दाखविण्यासाठी संघटनेने जनगणनेचे काम हाती घेतले असून हे काम कुंभार बांधवांनी एकजुटीने पूर्ण करून समाजाची ताकद दाखवावी. कारण समाजाला ताकद दाखविण्याची आता वेळ आली आहे, असे प्रतिपादन कुंमार समाज सामाजिक संस्थाचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी केले.
संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने कुंभार समाज जिल्हा मेळावा कसाल हायस्कूल येथे आयोजित केला होता. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी दरेकर बोलत होते. यावेळी गोव्याचे आमदार प्रेमेंद्र शेट, जिल्हाध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर, शरद वाडेकर, तुळशीदास कुपेरकर, रामदास सांगवेकर, वसंतराव घोडनिधीकर, प्रकाश भालेराव, ज्ञानेश्वर सोमवंती, प्रकाश साळवी, यशवंत शेटुलकर, दीपक बुरवाडकर, सुभाष शेटकर, विलास गुडेकर, करुणा चिंदरकर, समीर शेटकर, अॅड. जयंत गुडेकर, बंडेरावर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, कुंभारबांधवांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. शासनाकडून कुंभार बांधवांना माती पुरविण्याची परवानगी देण्यात आली असून एप्रिल ते मे महिन्यात वर्षभरासाठी लागणारी माती उचलावी. तसेच बेरोजगारांचा प्रश्न रोजगार मेळावा घेऊन सोडवला जाणार आहे. संघटना चांगली काम करीत असून कुंभारसमाज आता पुढे जात आहे. महिलांना प्रतिनिधीत्व देऊन संघटनेला महिलांचा पाठिंबा मिळवावा. त्यासाठी लवकरच महिला सक्षमीकरणाचे काम संघटनेमार्फत सुरु होणार आहे. समाज भवानासाठी चांगला आरखडा तयार करा, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, गोवा व सिंधुदुर्ग एक असून हे नाते टिकविण्याचे काम संघटना करीत आहे गोव्यामध्ये कुमार समाज अल्प असून कुमार समाज गोव्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. कुंभार बांधवांनी गोरोबा काकांचा आदर्श घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विलास गुडेकर, प्रकाश भालेराव, शरद वाडेकर यांनी विचार मांडले
आरंभी सतीश दरेकर यांच्या हस्ते संतश्रेष्ठ गोराकुंभार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सतीश दरेकर यांच्या हस्ते तालुका अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे शासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या कुंभारबांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. गणपत शिरोडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नारायण साळवी यांनी केले. आभार दिलीप सांगवेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने कुंभार समाजबांधव उपस्थित होते.

