*कोकण Express*
*तळेरे प्रभागातील बहुसंख्य मुलांना दाखवला ‘ पावनखिंड ‘ चित्रपट*
*वारगावच्या नाना शेट्ये यांनी राबविली ऐतिहासिक क्षेत्रभेट*
*कासार्डे संजय भोसले*
शाळेच्या अभ्यासक्रमात इतिहास , भूगोल विषयांमध्ये क्षेत्रभेटीचे शैक्षणिक उपक्रम असतात. त्याचाच एक भाग म्हणून माजी वारगाव उपसरपंच व वारगाव नं.३ शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाना शेट्ये यांच्या दातृत्वातून तळेरे प्रभागातील तीनशे पन्नासपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना ‘ पावनखिंड ‘ चित्रपट मोफत दाखवून एक ऐतिहासिक सफरच घडवून आणली.
त्यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मुलांचे व शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत , माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार , माजी कणकवली सभापती दिलीप तळेकर , माजी उपसभापती प्रकाश पारकर , वारगाव उपसरपंच इरफान मुल्ला , माजी सरपंच एकनाथ कोकाटे ,कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर ,प्रणिल शेटये,तेजस जमदाडे, राजा जाधव , पपू लिंगायत , रवी गुरव , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , खारेपाटण शेर्पे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव आणि शेर्पे , कुरंगवणे खैराट , शिडवणे नं.१ , साळीस्ते नं.१ , कांजीर , कोनेवाडी , वायंगणी , वारगाव , नडगिवे , खारेपाटण शाळांमधील मुख्याध्यापक , शिक्षक , पालक , शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत पदाधिकारी आदी उपस्थित होते.
प्रवेशद्वारावर झालेल्या स्वागत समारंभात प्रकाश पारकर म्हणाले , ” छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची जगात ओळख करुन दिली आहे. त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या जीवांचे बलिदान दिले होते. पावनखिंड हा चित्रपट पाहून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम सदैव जागृत ठेवले पाहिजे. ” मुलांना एका आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक क्षेत्रभेटीची सफर घडवून आणल्याबद्दल तळेरे प्रभागाच्या वतीने चित्रपट दाते नाना शेट्ये यांचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी आभार मानले. बाजीप्रभूंच्या जीवनावर व शिवचरित्रावर आधारित ‘ पावनखिंड ‘ हा ऐतिहासिक चित्रपट दाखवल्याबद्दल सर्व गावातील पालक , शिक्षक यांनी नाना शेट्ये आणि मंडळी यांच्या अनमोल दातृत्वाचे कौतुक केले आहे व आभारही मानले आहेत. नाना शेट्ये यांनी त्यावेळी खाऊवाटप केले.