*कोंकण एक्सप्रेस*
*शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुकाप्रमुख संजय गवस आक्रमक*
*कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यात कृषी विभागाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विविध शासकीय कृषी योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब, अपुरा कर्मचारी वर्ग आणि शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. मात्र, तालुक्यात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे अनेक योजना रखडल्याचा आरोप होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर १२ पदांपैकी केवळ ६ कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, एका कृषी सहाय्यकाकडे तब्बल दहा-दहा गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना वेळेत भेटी, मार्गदर्शन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे.
‘मागेल त्याला कलमे’, पॅक हाऊस, पीक विमा, रोजगार हमी योजना तसेच इतर अनेक कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. मात्र, अनेक अर्जदारांना अद्यापही लाभ मिळालेला नसल्याची तक्रार आहे. योजनांची माहिती, अर्जांची स्थिती किंवा मंजुरीबाबत स्पष्ट माहिती कृषी विभागाकडून मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
याशिवाय, शासनाने जाहीर केलेली आंबा व काजू पिकांच्या नुकसानभरपाईबाबतही अद्याप निश्चित माहिती दिली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नुकसानभरपाई कधी मिळणार, याबाबत कृषी विभागाकडे विचारणा करूनही ठोस उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
दरम्यान, ‘मागेल त्याला कलमे’ योजनेत निकृष्ट दर्जाची कलमे वितरित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरील त्रुटी असताना स्थानिक कृषी सहाय्यकांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याचाही आरोप होत आहे.
कृषी विभागातील कर्मचारी टंचाई, योजनांच्या अंमलबजावणीतील विलंब, नुकसानभरपाईबाबतचा संभ्रम आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी यामुळे संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, अनेक पात्र शेतकरी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांनी कृषी विभागाने तातडीने रिक्त पदे भरून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई व योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला जाब विचारत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे

