मोफत काजू कलमे दोडामार्गमध्येच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन; संदेश वरक यांचे उपोषण स्थगित..

मोफत काजू कलमे दोडामार्गमध्येच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन; संदेश वरक यांचे उपोषण स्थगित..

*कोंकण एक्सप्रेस*

*मोफत काजू कलमे दोडामार्गमध्येच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन; संदेश वरक यांचे उपोषण स्थगित..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत काजू कलमे स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक (सोनवले) यांनी गुरुवार, दि. 23 जुलै रोजी कृषी कार्यालय, दोडामार्ग येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित केले.
उपोषणादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी सौरभ कदम यांच्याशी चर्चा केली. तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दूरध्वनीद्वारे पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सध्या मोफत काजू कलमे निळेली येथून वितरित करण्यात येत असल्याने दोडामार्ग तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना तेथून कलमे आणणे गैरसोयीचे ठरत होते. विशेषतः प्रत्येक मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला ५० कलमे स्वतः निळेली येथून आणणे शक्य नसल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग कृषी कार्यालयामार्फतच काजू कलमे उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता दिली. तसेच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून काजू कलमे दोडामार्ग कृषी कार्यालयात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, मनसे कार्यकर्ते नवलू झोरे, नितीन देसाई, अनुराग रेडकर, अक्षय कुबल, अर्जुन धुरी, तसेच शिवसेना कार्यकर्ते मिलिंद नाईक व मनसे-शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!