*कोंकण एक्सप्रेस*
*एसटी चालक-वाहकाचा मनमानीपणा!*
*सामान कक्ष (डिकी) न उघडल्याने प्रवाशाचा संताप!*
*कणकवली बस स्थानकातील प्रकार!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली एसटी बस स्थानकात चालक आणि वाहकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवाशाला प्रवासासाठी मोठे सामान बसच्या सामान कक्षात (डिकी) ठेवायचे होते. मात्र, सामान कक्ष उघडून देण्यास चालक आणि वाहकाने नकार दिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी चालक – वाहकाने सामान कक्षाची चावीच नसल्याचे कारण सांगितले. त्यामुळे प्रवाशांना मोठे सामान घेऊन बसमध्येच प्रवास करण्याची वेळ आली होती. हा प्रकार पाहून उपस्थित असलेल्या एका नागरिकाने चालक आणि वाहकाला याबाबत जाब विचारला. त्यानंतर चालक – वाहकाची तारांबळ उडाली.
अखेर बस डेपोतून सामान कक्षाची चावी तातडीने मागविण्यात आली. त्यानंतर संबंधित प्रवाशाला आपले सामान डिकीमध्ये ठेवता आले आणि बस नियोजित प्रवासासाठी रवाना झाली.
या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुविधांसाठी उपलब्ध असलेला सामान कक्ष (डिकी) उघडण्यासाठी आवश्यक चावीच चालक – वाहकाकडे नसणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली.
या प्रकाराची माहिती विभाग नियंत्रकांनाही देण्यात आली असून संबंधित चालक – वाहकाच्या निष्काळजीपणाबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच भविष्यात प्रवाशांना अशा गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सामान्य प्रवाशांनी चालक – वाहकांच्या निष्काळजीपणाचा त्रास का सहन करायचा, असा सवालही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला.

