*कोंकण एक्सप्रेस*
*आरएसएस व भाजपच श्री राम मंदिर लुटण्याच काम ; राष्ट्रीय काँग्रेसचा आरोप*
*वेंगुर्लेत काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह*
*वेंगुर्ले : प्रतिनिधि*
आरएसएस व भाजपने अयोध्येतील श्री राम मंदिर लुटण्याचे काम केले असल्याचा आरोप करत आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसकडून वेंगुर्ला येथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करण्यात आला. यावेळी टाळांच्या सहाय्याने भजन करत श्री राम मंदिरात झालेल्या चोरीचा निषेध करून चोरी करणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
गुरुवारी (१६ जुलै) वेंगुर्ला येथील दाभोली नाका येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी “रघुपती राघव राजा राम” भजन म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वैभव वेंगुर्लेकर, जिल्हा सरचिटणीस विधाता सावंत, माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, प्रकाश डिचोलकर, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब, समाधान बांदवलकर, श्रेयस गावडे, सुंदर प्रजापती, तन्मय वेंगुर्लेकर, साईश परब, कुणाल घाडी, हर्षद गाडी, सतेज मयेकर, राईस्टर फर्नांडिस
आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर म्हणाले, राम मंदिरात चोरी करणारे हे भाजपच्या विचारांचे आहेत. एवढी मोठी घटना घडून सुद्धा त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. श्री राम मंदिर पूर्ण झालेलं नसताना सुद्धा घाईघाईत पंतप्रधान मोदी यांनी मोठा गाजावाजा करून उद्घाटन केलं. मग आता एवढी मोठी चोरी झाली असताना त्यांनी जनतेच्या समोर येऊन बोलणे गरजेचे होते. चोरी करणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे असल्याचे ते म्हणाले.
तर माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी भाजप व आरएसएस वर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, अयोध्येत श्री राम मंदिरात झालेली चोरी म्हणजे ३४० कोटी लोकसंख्येच्या आस्थेचा प्रश्न आहे. राम मंदिर ची ट्रस्ट कमिटी केंद्र सरकारने नियुक्त केलेली आहे. आणि मोदींच्या पसंतीने त्या ठिकाणी ट्रस्टी नेमले गेले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्या शिवाय ही एवढी मोठी चोरी होऊ शकत नाही. हजारो कोटीची चोरी त्या ठिकाणी झाली आहे. खालच्या सात ते आठ लोकांना पकडून अटक करून त्यांच्यावर कारवाई केल्याचा जे नाटक केलं जातंय तसे न करता चंपत राय सारख्या माणसाला अटक करा. मोठ्या ट्रस्टींना अटक करा. जे मोठे मासे आहेत त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे. जोपर्यंत या मोठ्या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हा काँग्रेसचा सत्याग्रह सुरू राहील. आरएसएस आणि भाजपने हे मंदिर लूटण्याचं काम केलेलं आहे. श्री राम प्रति त्यांना कोणतीही आस्था नसून लुटण्यासाठी राम मंदिर बांधण्यात आलं होतं. श्रद्धेला जो तडा गेला आहे तो तडा कधीही भरून येणार नाही. त्यामुळे या देशातील जनता यांना कधीही माफ करणार नाही असे जोरदार आरोप त्यांनी केले.

