ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात ” भल्ली भल्ली भावय ” उत्साहात

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात ” भल्ली भल्ली भावय ” उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात ” भल्ली भल्ली भावय ” उत्साहात*

*वरुणराजाने पाठ फिरविल्याने कृतिमरित्या पाण्याचा पुरवठा*

*शिरगांव : संतोष साळसकर*

” भल्ली भल्ली भावय… साळशीच्या संता ” च्या जयघोषात देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथील 84 खेड्याची अधीपती आणि श्री संत सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील पटांगणात ” भावई ” हा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पार पडला. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावेळी मंदिराच्या विहिरीतील पाणी मोटरपंपाद्वारे उपसा करून सर्वत्र चिखल करून त्याचा आनंद सर्वांनी लुटला.
आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी ‘ भावई ‘ या उत्सवाने या देवीच्या उत्सवाला प्रारंभ होतो. या उत्सवाच्या आदल्या दिवशी सायंकाळी ” देसरूढ ” पिटाळले जाते. गावातील रोगराई, भुतावळ गावच्या चतुरसीमेवर पिटाळली जाते. जेणेकरून गावातील लोकांचे रक्षण व्हावे. हि त्यामागील भावना असते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कर्क संक्रातीला दुपारी ‘ भावई ‘ या उत्सवाला सुरुवात होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या उत्सवाला खरी रंगत येते. भात शेतीच्या कामातून वेळ काढत गावकरी मंडळी अतिशय आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात या उत्सवात सामील होतात. या दिवशी सकाळी श्री देव गांगो, श्री देव वशिक तळखंबा व श्री देवी पावणाई या स्थळाना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर दुपारी गावातील सर्व बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ, भाविक याठिकाणी जमा होतात.

यावेळी ढोल ताशांच्या गजरात… एकमेकांवर चिखल फेक आणि पाण्याचा मारा करीत असताना कुणीही कुणावर रागावत नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजण वागतात. यावेळी देवीच्या समोरील पटांगणात चिखलात खोलवर गाडलेले श्रीफळ प्रत्येकजण गोल रिंगण करून हस्तकौशल्याने काढण्याचा प्रयत्न करतात. त्याला ” सापड खेळणे ” असे म्हणतात. यावेळी प्रत्येकाच्या अंगावर चिखल आणि पाण्याचा मारा केला जातो. यावेळी होळदेव कडील सुमारे 100 किलो वजनाचा गोल दगड प्रत्येक जण आपल्या हस्तकौशल्याने उचलून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात.
हा खेळ खेळल्यानंतर सर्वजण चौऱ्यांशीच्या चाळ्यावर जाऊन श्रीफळ व भक्ष देऊन प्रत्येकाचे नवस बोलणे व फेडण्याचे काम पार पडते. मग सर्वजण पुन्हा देवीच्या मंदिरापाशी जमा होतात आणि ‘काल्पनिकरित्या शिकारीचा’ खेळ सुरु होतो. यावेळी एका व्यक्तीला मारण्याचा अविर्भाव करून शिकार केली जाते. सोनार व शिंपी समाजातील शिवकळा ( अवसर ) काढण्याचे नाटक करून शिकार कापण्यास हुकूम देतात. या शिकारीला सूरी लावण्याचा मान पारधी घराण्याचा असतो.

त्यानुसार देवीच्या दरबारातून वाजत गाजत या शिकारीची मुंडी ( आंब्याचा टाळ ) मतकरी ( मिराशी ) कुटुंबियांकडे नेली जाते. तिथे त्याची पूजा करून उपस्थित बारापाच मानकरी, ग्रामस्थ तसेच भाविकांना भोजनाचा प्रसाद दिला जातो.
अतिशय शिस्तबद्ध अशा या ” भल्ली भल्ली भावय ” च्या भक्तिमय उत्सवात प्रत्येकजण मनसोक्त न्हावून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!