*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडील कंत्राटी भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलून जिल्हाबाहेरील उमेदवारांना नियुक्ती*
*जिल्हा परिषद आरोग्य विभागातील “एक” कर्मचारी मेडिकल कॉलेज व रुग्णालयाकडील बहुतांश सेवांचा ठेकेदार..!*
*”अधिष्ठातांकडून जिल्ह्याबाहेरील लोकांना पोसण्याचा धंदा!
प्रसाद गावडेंचा आरोप*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार म्हणजे “जिल्हावासीय उपाशी व जिल्ह्याबाहेरील तूपाशी” असाच काहीसा चालू असून जिल्हा प्रशासनाचे त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने तिथल्या भ्रष्टाचारी टोळीचे प्रताप दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्णांना मिळणाऱ्या तकलादू आरोग्य सुविधा पाहता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून “भीक नको पण कुत्रं आवर” म्हणायची पाळी स्थानिक जिल्हा वासियांवर आलेली आहे. मेडिकल कॉलेज रुग्णालयात कंत्राटी भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलून जिल्हा बाहेरील उमेदवारांची भरती करण्याचे प्रकार उघड होत आहेत. मेडिकल कॉलेज रुग्णालयाची नूतन इमारत बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक भरती करून घेतले जातं असून जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांवर अन्याय केला जात आहे.
शिवाय मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडील बहुतांश कंत्राटी सेवांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील पर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला एक औषधनिर्माता कर्मचारी “पुरवठादार” ठेकेदार म्हणून रुग्णालयात दैनंदिन वावरत असल्याची माहिती मिळाली आहे. कँटीन सेवा,बस सेवा,औषधं पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी निवासी सेवा अशा अनेक सेवांसाठी पूरवठा ठेकेदार व्यक्ती हा जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा कर्मचारी असून कामावर अनुपस्थित राहून दैनंदिन मेडिकल कॉलेजमध्ये अधिकाऱ्यांच्या “बाह्य”सेवेसाठी घिरट्या घालत असतो अशा तक्रारी प्राप्त होतं आहेत. या ठेकेदाराने जिल्ह्यातील पुरवठादारांच्या रोजीरोटीवर ” नांगरा’सकट” बैल फिरवला असून अधिष्ठाता सेवा पुरवठादारांशी संगनमत करत स्थानिकांवर अन्याय करून जिल्ह्याबाहेरील लोकांना पोसत असल्याचा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. मेडिकल कॉलेज व रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने भ्रष्ट प्रवृत्तींचे प्रताप दिवसेंदिवस वाढत चालले असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन मेडिकल कॉलेज कडील काळ्या कारभाराचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

