साळशी-झरीचीवाडी येथील धोकादायक विद्युत पोल बदलण्याची मागणी

साळशी-झरीचीवाडी येथील धोकादायक विद्युत पोल बदलण्याची मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी-झरीचीवाडी येथील धोकादायक विद्युत पोल बदलण्याची मागणी*

*पंधरा वर्षांपूर्वी जीर्ण झालेला विद्युत पोल पुन्हा उभारला*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी-झरीचीवाडी येथील अजय सदानंद नाईक यांच्या घराजवळील लोखंडी विद्युत पोल सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून तो तातडीने बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. सदर पोल जमिनीपासून मोठ्या प्रमाणात गंजून गेला असून त्याला मोठे छिद्र पडले आहे. पोलचा खालचा भाग पूर्णपणे सडल्याने तो कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पोलजवळून नागरिकांची सतत ये-जा असते. तसेच परिसरात घरे असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यामुळे हा पोल अधिक धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वीही हा पोल गंजून धोकादायक बनला होता. त्यावेळी सदर पोलचा जीर्ण भाग तोडण्यात आला होता. आणि नवीन पोल उभारण्याऐवजी हाच जुना पोल पुन्हा उभारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
याबाबत सरपंच, ग्रामपंचायत साळशी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, शिरगाव कार्यालय यांना लेखी निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली असल्याचे अजय नाईक यांनी सांगितले.
संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक विद्युत पोल बदलावा व संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!