*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीचे रुग्णालय ‘आयसीयू’त!*
*प्रसुतीचे रुग्ण फक्त होतात ‘रेफर ; रिक्त पदांचे ग्रहण सुटेना*
*कणकवली : संजना हळदिवे*
कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय आहे. साहजिकच येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही तेवढीच मोठी असते. मात्र, या रुग्णालयाला मागील काही वर्षांपासून रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाला १७ डॉक्टर मंजूर असतानाही केवळ दोनच ‘परमनंट’ डॉक्टर येथे कार्यरत आहेत. दुर्दैव म्हणजे दोन वर्षांपूर्वी स्त्रीरोगतज डॉ. चांद शिकलगार असताना महिन्याला शेकडो प्रसुती शस्त्रक्रिया होणाऱ्या या रुग्णालयात सध्या स्त्रीरोगतज्ज्ञाअभावी महिन्याला एकही शस्त्रक्रिया होत नाही, हे वास्तव आहे. पालकमंत्री नीतेश राणेंच्या मतदारसंघात असणाऱ्या या रुग्णालयाची स्थिती नेमकी कधी सुधारणार, असा सवाल आता नागरिकांमधून होऊ लागला आहे.
कणकवली हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर आहे. साहजिकच येथील उपजिल्हा रुग्णालयात कणकवलीसह देवगड, वैभववाडी, मालवणसह नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातूनही रुग्ण येत असतात. मात्र, स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे येथील रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत चालली असून याचा संबंधित शासकीय विभागाने गंभीर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
केवळ दोनच ‘परमनंट’ डॉक्टर
रुग्णालयाला स्पेशालिस्ट व एमबीबीएस डॉक्टरांची मिळून १७ पदे मंजूर आहेत. त्यातील अस्थीरोतज्ज्ञ डॉ. डोंगरे व एमबीबीएस डॉ. पंकज पाटील असे दोनच कायमस्वरुपी डॉक्टर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ‘वैद्यकीय अधीक्षक’ हे पदही रिक्तच आहे. परिणामी ‘एनआरएचएम’मधून कार्यरत असलेले सर्जन डॉ. महेंद्र आचरेकर, अस्थीरोगतज डॉ. धनंजय रासम, भूलतज्ज्ञ डॉ. हेमा तायशेटे, फिजिशियन डॉ. संकेत पोकळे व धनेश म्हसकर या खासगी डॉक्टरांवर हे रुग्णालय अवलंबून आहे. जोडीला काही प्रशिक्षणार्थी डॉक्टर असतात. मात्र, या डॉक्टरांना खास निर्णय घेण्याचा, शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार नाही. परिणामी हे रुग्णालय सद्यस्थितीत कोमात गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
प्रसुतीचे रुग्ण रेफर होताहेत
रुग्णालयात दोन वर्षापूर्वी डॉ. चांद शिकलगार हे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यावेळी रुग्णालयात महिन्याला जवळपास १०० तरी प्रसुती शस्त्रक्रिया व्हायच्या. मात्र, शिकलगार यांच्या बदलीनंतर रुग्णालयाला कायमस्वरुपी स्त्रीरोगतज्ज्ञ मिळू शकला नाही. काही काळ डॉ. दीपकर व त्यानंतर डॉ. नित्यानंतर मसुरकर स्त्रीरोतज्ज्ञ होते. मात्र, मसुरकर हे सप्टेंबर २०२५ मध्ये येथून सोडून गेले. साहजिकच गेले आठ महिने रुग्णालय स्त्रीरोतज्ज्ञाविना आहे. परिणामी प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांना ओरोस येथील शासकीय महिला रुग्णालय किंवा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवावे लागते. आता तर या रुग्णालयात कायमस्वरुपी किंवा एनआरएचएममधूनही स्त्रीरोतज्ज्ञ नसल्याचे नागरिकांनाही समजले आहे. परिणामी या रुग्णालयात प्रसुतीसाठी रुग्ण येतस नसल्याचे प्रकषनि दिसून आले आहे. महिन्याला तीन ते चारच रुग्ण प्रसुतीसाठी दाखल होतात व त्यांना देखील कुडाळ, सावंतवाडीला किंवा खासकरून खासगी रुग्णालयात हलवावे लागते, अशी स्थिती आहे. एकीकडे रुग्णालयात सुसज्ज असा प्रसुतीकक्ष आहे. मात्र, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने हा प्रसुती कक्ष सध्या धूळखात पडलाय, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. प्रसुतीच्या रुग्णांची सोनोग्राफी व अन्य तपासणीसाठी रेडीओलों-जिस्ट आवश्यक असतात. मात्र, या रुग्णालयाचे डॉ. चौगुले यांच्यानंतर या रुग्णालयाला पूर्णवेळ रेडिओलॉजिस्टही मिळालेला नाही. यासह अनेक पदे येथे रिक्तावस्थेत आहेत.
आता जबाबदारी पालकमंत्र्यांची…
‘कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि रिक्त पदांची समस्या’ हे समीकरणा तसे वर्षानुवर्षेच आहे. त्यावेळी आमदार असताना विद्यमान पालकमंत्री नीतेश राणे यांनी या समस्येबाबत अनेकदा आंदोलने देखील केली आहेत. साहजिकच आता पालकमंत्री पदावर असताना उपजिल्हा रुग्णालयाला या दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी नीतेश राणे यांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही नागरिकांमधून बोलले जातेय.

