*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली शहरात नालेसफाई मोहिमेला वेग…*
*४० पेक्षा अधिक गटारे आणि नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू..*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आला आहे. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे, दुर्गंधी पसरणे आणि डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून, शहरातील ४० पेक्षा अधिक गटारे तसेच मोठ्या नाल्यांची साफसफाई सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर, रहिवासी भाग तसेच पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या सखल ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून सांगण्यात आले. अनेक वर्षांपासून गाळ, प्लास्टिक कचरा आणि झाडाझुडपांनी भरलेल्या गटारांची आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने साफसफाई केली जात आहे.
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, गटारांमध्ये किंवा उघड्यावर कचरा टाकू नये, असे सांगण्यात आले आहे. वेळेत नालेसफाई पूर्ण झाल्यास पावसाळ्यात शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, काही भागांमध्ये अजूनही साफसफाईची गरज असून, त्या ठिकाणीही उर्वरित कामे लवकरात लवकर आणि तातडीने पूर्ण केली जातील, अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

