*कोंकण एक्सप्रेस*
*शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाचा दहावी निकाल ९३.७५ टक्के ; श्रीशा नाईक प्रथम*
*दोडामार्ग | शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९३.७५ टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेच्या या उज्ज्वल यशामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत कु. श्रीशा शाम नाईक हिने प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. कु. भूमी हनुमंत सावंत हिने द्वितीय, तर कु. गौरी तिलकांचन गवस हिने तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश मिळवले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

