*कोंकण एक्सप्रेस*
*शिवडाव हायस्कूलच्या रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न लवकरच सुटणार*
*शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन*
*१५ ऑगस्टपूर्वी शिक्षक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा*
*कणकवली : प्रतिनिधी*
शिवडाव माध्यमिक विद्यालयातील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भेटीत शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक मुकेश पवार, सरपंच नितीश भिसे, शालेय समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी पालक तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी शिवडाव हायस्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम आणि शाळेला तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची गरज याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संदेश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत शाळेतील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. या चर्चेनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी शिवडाव हायस्कूलला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शिक्षक समायोजन प्रक्रियेतून शाळेला शिक्षक देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, येत्या १५ ऑगस्टपूर्वी शिवडाव हायस्कूलला शिक्षक उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देणारे निवेदनही यावेळी देण्यात आले.
मात्र, अशी वेळ येणार नाही. लवकरच शिवडाव हायस्कूलला शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या वेळी शिवडावचे सरपंच नितीश भिसे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक नाडकर्णी, नितीन गावकर, नितीन हरमलकर, चंदू शिरसाट, अमेय सावंत, विनोद गावकर, मिलिंद गावकर, स्वप्निल वर्धम, शालेय समिती सदस्य गणेश मस्कर, कृष्णा गावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

