“दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उघड!” – कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

“दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उघड!” – कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

*कोंकण एक्सप्रेस*

*“दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उघड!” – कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर..*

*दोडामार्ग | शुभम गवस*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जनता आरोग्य दरबारच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव उघडकीस आले असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत गंभीर त्रुटींचा भडिमारच समोर आला आहे.

रुग्णालयातील परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले असून, रुग्णांना मूलभूत सुविधा मिळण्यातही मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

यावेळी नंदन वेंगुर्लेकर, सुभाष गोवेकर, संजय लाड, स्क्रुझ फर्नांडिस, समिर शिंदे, डॉ. अतुल पांढरे, भूषण सावंत, संदिप गवस, उदय पास्ते, बाळा ऊर्फ कृष्णा धाऊसकर, सागर शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

समस्यांचा पाढा वाचताना संताप अनावर!

कृती समितीच्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

रुग्णालयातील एक्स-रे मशीन व सोनोग्राफी सेवा नियमित नाहीत

डायलेसिस सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा अपुरी

दंत चिकित्सालयात आवश्यक साहित्याचा पूर्ण अभाव

पिण्याच्या पाण्यासाठीचा आर.ओ. प्लांट बंद अवस्थेत

छतगळतीमुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय

अपुरा कर्मचारी वर्ग – सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर

या सर्व समस्यांमुळे रुग्णालयाची अवस्था ‘नावापुरती सेवा, प्रत्यक्षात हालअपेष्टा’ अशी झाली असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

“आता नाही तर कधीच नाही!” – आंदोलनाचा इशारा

या गंभीर समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा जनतेचा उद्रेक अनिवार्य असल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

सदर प्रश्न सोडवण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी नगरपरिषद येथे उद्या बुधवार दिनांक २९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीचे नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

आरोग्याच्या नावावर सुरू असलेला हा ढिसाळ कारभार थांबवून तातडीने सुधारणा करणार का प्रशासन? की जनतेला रस्त्यावर उतरावे लागणार ? – असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!