*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेत चिंतामणी भजन मंडळ प्रथम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
येथील श्री सातेरी देवीच्या मळलेपन आणि शतचंडी महायाग अनुष्ठानाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेत वेंगुर्ला-तळेकरवाडी येथील चिंतामणी प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
वेंगुर्ला येथील ग्रामदेवी श्री सातेरीचा मळलेपन विधी नुकताच संपन्न झाला. यानिमित्त 22 ते 26 एप्रिल कालावधीत मंदिरात शतचंडी महायाग अनुष्ठान करण्यात आले. यानिमित्त 24 व 25 एप्रिल या कालावधीत निमंत्रितांची जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा आयोजित केली होती. यात चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ (तळेकरवाडी-वेंगुर्ला)-प्रथम, मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नेरूर)-द्वितीय, सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ (कोंडुरा)-तृतीय, तर श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ (अणसूर) आणि ओटवणे येथील रवळनाथ नवतरूण भजन मंडळाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
वैयक्तिक बक्षिसांमध्ये हार्मोनिअम – सचिन सावंत (इसोटी भजन मंडळ, मातोंड), कोरस-गोठण भजन मंडळ-वजराट, तबला-कु. प्राजक्ता परब (रवळनाथ नवतरूण भजन मंडळ-ओटवणे), झांजवादक-कु.निशांत राणे (सद्गुरू भजन मंडळ-पिंगुळी), गायक-प्रसाद आमडोसकर (महापुरूष भजन मंडळ-पिंगुळी), पखवाज – प्रणव मेस्त्री (मोरेश्वर भजन मंडळ-नेरूर) यांचा समावेश आहे. स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून पिंगुळी येथील महापुरूष भजन मंडळाला तर देवीचा उत्कृष्ट गजर सादर केलेल्या ओटवणे येथील रवळनाथ नवतरूण भजन मंडळाला गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण रूपेंद्र परब आणि आनंद मोर्ये यांनी केले. बक्षिस वितरण श्री सातेरी देवस्थानचे मानकरी, ट्रस्टचे विश्वस्त तसेच परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.

