*कोंकण एक्सप्रेस*
*पर्यटनाला नवे पंख : अणाव दाबाची वाडी उद्यानामुळे सिंधुदुर्ग नगरीचा बदलणार चेहरामोहरा!*
*सिंधुदुर्गनगरी, दि. ०१ (जि.मा.का) :*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी लगत अणाव दाबाची वाडी तलाव शेजारील उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडणार आहे. जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन) या लेखाशीर्षातून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यापैकी आतापर्यंत ९८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या विकासकामाचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग नगरीच्या काठावर असलेल्या तलाव परिसराच्या सुशोभीकरणामुळे हा भाग पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. उद्यानाच्या विकासामध्ये भौतिक सुविधांचा दर्जा उंचावण्यात येणार असून नागरिक व पर्यटकांसाठी आकर्षक आणि सुरक्षित पदपथ उभारले जाणार आहेत. यासोबतच विविध प्रकारची झाडे लावून हरित, पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग नगरीच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे. स्थानिक नागरिकांसाठीही हा परिसर विरंगुळ्याचे ठिकाण बनत आहे.

