सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांबाबत नगराध्यक्षांचा ‘ॲक्शन मोड’…*

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांबाबत नगराध्यक्षांचा ‘ॲक्शन मोड’…*

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांबाबत नगराध्यक्षांचा ‘ॲक्शन मोड’…*

*प्रशासनाची घेतली तातडीची बैठक;नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीचे निर्देश…*

*सावंतवाडी : प्रतिनिधि*

येथील उपजिल्हा रुग्णालयाबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी रुग्णालय प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, भाजपचे नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, रुग्णालय प्रशासन, डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य आणि नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न आणि रुग्णसेवेतील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
​रुग्णालयाच्या इमारतीवर आणि आजूबाजूला वाढलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने तोडण्याचे तसेच परिसराची संपूर्ण साफसफाई करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका विभागाने योग्य समन्वय राखून पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. विशेषतः रुग्णालयातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करताना नगराध्यक्षांनी कठोर पवित्रा घेतला. पाण्याचे मागील सर्व थकीत देयके रुग्णालय प्रशासनाने भरून घ्यावीत, त्यानंतरच नवीन नळ कनेक्शन दिले जाईल. थकीत बिलांवरील व्याज माफ करून मिळावे यासाठी शासनाकडे रितसर प्रस्ताव पाठवला जाईल, ज्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असे आदेश त्यांनी दिले.
​रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून रुग्णालयात २ ते ३ बाक (बेंचेस) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पोस्टमार्टम रूमसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्यास सध्याच्या रूमचे तातडीने नूतनीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात पथदिवे बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच अंदाजपत्रक सादर करावे, असेही यावेळी सांगण्यात आले. या सर्व कामांचा पाठपुरावा करण्यासाठी नगराध्यक्षा स्वतः पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
​रुग्णालयातील व्हिलचेअरच्या कमतरतेबाबत डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी माहिती दिली की, यासाठी डीपीडीसी (DPDC) कडे मागणी करण्यात आली असून जुन्या वेंडरची थकीत बिलेही लवकरच अदा केली जातील. याचबरोबर डॉक्टरांसाठी नवीन निवासस्थाने उभारण्याबाबत विशेष तरतूद केली जाईल, असे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले. सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून रुग्णसेवा सुधारण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!