*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीत पाणी प्रश्न सुटला नाही तर नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा…संजू परब*
*नगराध्यक्षांचा प्रशासनावर अंकुश नसल्याची केली टीका…*
*सावंतवाडी,ता.२२: प्रतिनिधि*
शहरात एप्रिल महिन्यात कधीही पाणी टंचाईचे संकट ओढावले नव्हते, मात्र सध्या शहरात सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे पाण्याचा मोठा वणवा पेटला आहे. या गंभीर परिस्थितीला नगरपालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि नगराध्यक्षांचा नसलेला वचक कारणीभूत असून, येत्या चार दिवसांत हा प्रश्न सुटला नाही तर सावंतवाडीकरांना घेऊन नगरपालिकेवर ‘आक्रोश मोर्चा’ काढला जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
शहरात सध्या ठिकठिकाणी गॅस पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन अनेक ठिकाणी फोडल्या गेल्या आहेत. विशेषतः भाजी मार्केट परिसरात मुख्य जलवाहिनी फुटलेली असूनही अद्याप प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतलेली नाही. या हलगर्जीपणामुळे शहराच्या अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून लोकांच्या पाणी भरण्याच्या वेळा बदलल्या आहेत. अनेक ठिकाणी नळाला अत्यंत गडूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांचा प्रशासनावर कोणताही अंकुश राहिलेला नाही, अशी टीका करत संजू परब यांनी संताप व्यक्त केला. पाणी पाईपलाईनचे काम अत्यंत बोगस पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सभागृहातही यावर जाब विचारला आहे. संजू परब यांनी पुढे स्पष्ट केले की, जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना प्रशासन सुस्त बसले असेल, तर शिवसेना हे सहन करणार नाही. येत्या चार दिवसांचा अल्टिमेटम देत त्यांनी सांगितले की, जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करून नगरपालिकेला घेराव घातला जाईल. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर नगरसेवक बाबू कुडतरकर, देव्या सूर्याजी, अजय गोंदवले, शर्वरी धारगळकर आदी उपस्थित होते.

