“पाझर तलावाला कोणताही धोका नाही”: पिंगुळी सरपंचांचा विरोधकांना सडेतोड इशारा; पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

“पाझर तलावाला कोणताही धोका नाही”: पिंगुळी सरपंचांचा विरोधकांना सडेतोड इशारा; पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

*कोंकण एक्सप्रेस*

*”पाझर तलावाला कोणताही धोका नाही”: पिंगुळी सरपंचांचा विरोधकांना सडेतोड इशारा; पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण*

*कुडाळ: प्रतिनिधि*

पिंगुळी (ता. कुडाळ) येथील पाझर तलावाबाबत नवनिर्वाचित जि प सदस्य सडवेलकर यांनी केलेले आरोप सरपंच अजय आकेरकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पिंगुळी ग्रामपंचायतीची विनाकारण बदनामी करण्यासाठी हे आरोप केले जात असून, हे पक्षीय राजकारण असल्याचे त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. येथे २५७ पेक्षा जास्त बंगलो प्रकल्प होत असतील तर त्यामुळे येथील व्यापार वाढेल, पिंगूळीला उर्जितावस्था येऊन रोजगारही वाढेल असा विश्वासही सरपंच आकेरकर यांनी व्यक्त केला. यावेळी उपसरपंच सागर रणसिंग आणि सदस्य शशांक पिंगुळकर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच अजय आकेरकर यांनी सडवेलकर यांना खडेबोल सुनावले. “पिंगुळीमध्ये आता कुठे उबाठाला (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चांगले दिवस येऊ लागले आहेत, त्यांनी मिळालेल्या पदाचा वापर गावाच्या विकासकामांसाठी करावा, नाहक राजकारण करू नये,” असा सल्ला त्यांनी दिला. मी भाजपचा सरपंच असल्यामुळेच केवळ मला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ओरिजीन कंपनीला देण्यात आलेल्या एनओसी (NOC) बाबत माहिती देताना सरपंच म्हणाले की, “ही एनओसी बिनशेती (NA) करण्यासाठी देण्यात आली होती. तसेच, ग्रामपंचायतीने ही परवानगी महसूल विभागाच्या अटी व नळ योजनेची सुस्थिती राखण्याच्या शर्तीवरच दिली आहे. ग्रामपंचायत बॉडी, ग्रामसेवक आणि महसूल अधिकारी यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत तिथे सरकारी जागेवर कोणतेही अतिक्रमण आढळलेले नाही.”
तलावाबाबत बोलताना आकेरकर म्हणाले, “पाझर तलावाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने तिथे वेळोवेळी पाहणी केली आहे. या तलावाच्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी आम्ही पालकमंत्री मा.नितेश राणे साहेब आणि आमदार मा. निलेश राणे साहेब यांच्याकडे २० कोटींच्या प्रकल्पाची मागणी केली आहे. तसेच, बोरिंगसाठी १३ लाखांचे इस्टिमेट मंजूर झाले असून, लवकरच कामाला सुरुवात होईल.”
२५७ बंगले होणार असल्याची बातमी वाचून आम्हालाही या विषयावर पहिल्यांदा माहिती मिळाली, अशी भूमिका घेत सरपंचांनी स्पष्ट केले की, “घर बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नसून ते नगररचना विभागाकडे आहेत. या प्रकल्पाचा कोणताही रीतसर आराखडा किंवा अधिकृत माहिती ग्रामपंचायतीकडे अद्याप आलेली नाही.”
तलावाकडे जाण्यासाठी अधिकृत रस्ता नसल्याचे मान्य करत, सडवेलकर यांनी आरोप करण्यापेक्षा तो मार्ग खुला करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, मागील चाळीस वर्षांत तलावातील गाळ उपसा का केला नाही? असा सवाल करत, विरोधकांना केवळ सरपंचांना टार्गेट करणे हेच काम उरले आहे का, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान पाझर तलावाचे पाणी दूषित होण्याबाबत श्री. आकेरकर यांना विचारले असता, कंपनी कडून त्याबाबतचा कोणताही आराखडा पिंगुळी ग्राम पंचायतीला आला नसल्याचे त्यांनी सांगितले. पिंगुळी गावासाठी पाझर तलावाप्रमाणेच खोडदेश्वर नदी हा पाणी पुरवठा पर्याय आहे. पाझर तलावाचा वापर आम्ही राखीव पाणी साठा म्हणून करतो. पाझर तलावाची पाहणी केली असता अजून पर्यंत तरी पाणी चांगले आहे, कोणताही धोका नाही असे श्री. आकेरकर यांनी सांगितले.
कंपनीच्या अर्जानुसार बिनशेती रेखांकन परवानगी देण्यासंदर्भात खास सभा लावण्यात आली होती. त्याला १७ पैकी १३ ग्रा.प. सदस्य उपस्थित होते. तसेच या विषयावर एक ग्रामसभा सुद्धा झाली, असे सरपंच श्री. आकेरकर म्हणाले. येथे २५७ पेक्षा जास्त बंगलो प्रकल्प होत असतील तर त्यामुळे येथील व्यापार वाढेल, पिंगुळीला उर्जितवस्था येईल, रोजगार वाढेल असा विश्वास श्री. आकेरकर यांनी व्यक्त केला. नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी काही झाडांची तोड झाली आहे, त्याबाबत त्या जमिनीच्या मालकाने वनविभागाची परवानगी घेऊन तोड केल्याचे श्री. आकेरकर यांनी सांगितले. या विषयासंदर्भात ग्राम पंचायत गावाच्या बाजूने ठाम उभी राहील असा विश्वास सरपंच अजय आकेरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!