*कोंकण एक्सप्रेस*
*मुंबईस्थित हेत ग्रामस्थांची “हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१” क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
*वैभववाडी : प्रतिनिधि*
मौजे हेत (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील मुंबईस्थित ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१’ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई दिवा-खर्डी येथील टर्फ मैदानावर मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. सकाळी ९.०० ते सायंकाळी ९.०० या वेळेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या हेत गावातील तरुणांनी व्हॉट्सअॅप व दूरध्वनीच्या माध्यमातून एकत्र येत या स्पर्धेचे आयोजन केले. तसेच हेत गावातील ग्रामस्थ खेळाडू मुंबईला येऊन मोठ्या उत्साहाने क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले, सकाळी १०:०० वाजता आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास/प्रतिमेस पुष्पहार अर्पण व जयघोष करत, तसेच ग्रामदैवत श्री देव केदारलिंगप्रति श्रीफळ अर्पण करून व आशीर्वाद घेऊन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धेला प्रारंभ झाला.
स्पर्धेत एकूण ९० खेळाडू व १० संघमालक सहभागी झाले होते. प्रत्येक सामना तीन षटकांचा ठेवण्यात आला होता. फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर गोलंदाजांनी ऑफस्पिन, लेगस्पिन व गुगलीच्या चेंडूंनी उपस्थितांची दाद मिळवली. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूस ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात येत होता. मैदानावर रंगीबेरंगी टी-शर्ट परिधान केलेल्या खेळाडूंमुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते.
सहभागी खेळाडू व ग्रामस्थांसाठी सकाळी चहा-नाष्टयाची व्यवस्था तसेच दुपारच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दिवसअखेर प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांना रोख बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट सामनावीर खेळाडूंना ट्रॉफी व पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी देणगीदार, मान्यवर, खेळाडू, संघमालक, नियोजक व समस्त हेत ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. मैदान समितीचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले. हस्तांदोलन व गळाभेट घेत सर्वांनी कार्यक्रमाची सांगता केली.
स्पर्धेचा मुख्य उद्देश
– मुंबईतील गावकऱ्यांना एकत्र आणणे
– ग्रामस्थांमध्ये एकता व एकोपा वाढविणे
– खेळाची आवड निर्माण करणे
– सामाजिक सलोखा वाढविणे
– गावाची संस्कृती जपणे
– तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणे
– क्रिकेट कौशल्य विकासाला चालना देणे
– क्रिकेटच्या माध्यमातून तरुण मुलांना योग्य दिशा देऊन, त्यांना गावच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त करणे, क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर गावाला जोडणारा एक दुवा आहे.
‘हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१’ स्पर्धेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा आयोजकांचा मानस व्यक्त करण्यात आला.

