*कोंकण एक्सप्रेस*
*पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याधारित शिक्षणावर भर द्यावा: मिलिंद साटम*
*शिरगाव येथील कर्ले महाविद्यालयास मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मिलिंद साटम यांची सदिच्छा भेट*
*शिरगांव : संतोष साळसकर*
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्किल-बेस्ड (कौशल्याधारित) कोर्सेसवर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी केले.
शिरगाव येथील पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयास १३ एप्रिल रोजी दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन संभाजी साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, प्राध्यापिका अक्षता मोंडकर, प्रा.कोमल पाटील, प्रा. आशय सावंत, प्रा. सोनाली ताम्हणकर, प्रा.सिद्धी कदम तसेच सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कौशल्याधारित शिक्षणावर सविस्तर मार्गदर्शन
आपल्या मार्गदर्शनात मिलीद साटम यांनी नवीन शैक्षणिक प्रवाहातील बदलांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पारंपरिक पदवी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. शिक्षण संस्थेने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी उच्च शिक्षणांच्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत या महाविद्यालयाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांच्या भेटीत कर्ले महाविद्यालयातील त्यांनी प्राध्यपकांना केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आगामी काळात शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी होईल असा विश्वास प्राचार्य समीर तारी यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व
मिलिंद साटम यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महाराष्ट्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सवर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे सल्लागार म्हणून शिक्षकांचे हक्क आणि शैक्षणिक विकासासाठी सतत मार्गदर्शन करत आहेत.मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र गुंफण्यासाठी त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ॲल्युमिनाय असोसिएशनची स्थापना केली असून सध्या ते या संस्थेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बजेट समितीसह विद्यार्थी तक्रार निवारण कक्षामध्ये सदस्य म्हणून ते विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत

