*कोंकण एक्सप्रेस*
*डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच सामाजिक परिवर्तन-संदेश पारकर यांचे प्रतिपादन*
*सोनगेवाडीतील आंबेडकर भवनात जयंती साजरी*
*कणकवली : प्रतिनिधि*
कणकवली शहरात महात्मा जोतिबाफुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार माणणारी मंडळी आहे. डॉ. आंबेडकर समाजात समता, बंधुता, स्वतंत्र्य निर्माण करण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचले. त्यामुळे देशातील दलित, वंचितांना न्याय व हक्क मिळले. बाबासाहेबांनी दलित, वंचितांना शिका, संघटिक व्हाव, संघर्ष करा हा कानमंत्र दिला. त्यामुळे समाजात दलित, वंचितांना मानसन्मान मिळत आहे. बाबासाहेबांमुळे समाजात परिवर्तन घडून आले, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोनगेवाडी येथील डॉ. आंबेडकर भवन येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, डॉ. सतीश पवार, अपूर्वा पवार, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, समता दलाचे कॅप्टन अरुण जाधव, वंचितचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पारकर म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शहरवासीयांनी मला प्रेम, आशीर्वाद, मतदान करून नगराध्यक्षपदी निवडून आणले. येत्या ५वर्षांत कणकवली शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्याचा माझा मानस आहे. नगराध्यक्षपदाची जाबबदारी स्वीकारल्यानंतर आनंद कासार्डेकर यांनी माझे भेट घेत सोनगेवाडी येथील डॉ. आंबेडकर भवन येथे प्रसाधनगृह बांधणे, रस्त्याची व्यवस्था करणे, संरक्षक भिंत बांधण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार लवकरच हे प्रश्न मार्गी लावणार आहे. शहरातील दलित, वंचितांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आनंद कासार्डेकर म्हणाले, संदेश पारकर यांनी सरपंचपदाच्या कारकीर्दीत डॉ. आंबेडकर भवन करमुक्त केले. त्यामुळे बौद्ध बांधवांवर त्यांचे उपकार आहेत, हे कद्यापिही विसरून चालणार नाही. डॉ. आंबेडकर भवन परिसरात प्रसाधनगृह बांधणे, रस्त्याची व्यवस्था करणे, संरक्षक भिंत बांधण्याबाबत आम्हाला शब्दा दिला आहे. तो हा शब्द पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय बौद्ध महासभेतर्फे संदेश पारकर, लुकेश कांबळे, दीपिका जाधव, तानाजी कांबळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाजबांधव उपस्थित होते. समतादलाचे कॅप्टन झाल्याबद्दल अरुण जाधव यांचा महासभेतर्फे सत्कार करण्यात आला.

