*कोंकण एक्सप्रेस*
*महिला नेतृत्वावर विश्वास; साटेली–भेडशी जि.प. मतदारसंघातून सौ. सुनंदा धर्णे उमेदवार..*
*दोडामार्ग / शुभम गवस*
साटेली–भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सौ. सुनंदा सुधाकर धर्णे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
सर्वसमावेशक विचारसरणी, सर्वांशी सलोख्याचे संबंध आणि महिलांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले नेतृत्व म्हणून सौ. सुनंदा धर्णे यांची ओळख आहे. विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी आजवर अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत. सध्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोडामार्ग तालुका महिला आघाडी प्रमुख म्हणून सक्रियपणे कार्यरत असून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार असतो.
न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन, उपोषण यांसारख्या मार्गांचा अवलंब करत त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. माजी उपसभापती म्हणून त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामांना गती मिळाली. आदर्श महिला नेतृत्व म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची ओळख असल्याने पक्षनेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेत साटेली–भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या उमेदवारीमुळे मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत ही उमेदवारी निर्णायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

