कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार*

*कलमठ ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी पुढाकार; सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त निर्णय घेतल्याची सरपंच संदीप मेस्त्री यांची माहिती*

*कणकवली ः संजना हळदिवे*

पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचे सौंदर्य काढून घेणाऱ्या, आणि तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगण्यास भाग पाडणाऱ्या विधवा प्रथेला नकार देऊन माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतिने घेतला आहे. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळणार नाही अशा घरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा क्रांतिकारी पुढाकार कलमठ ग्रामपंचायतचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सरपंच मेस्त्री यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.

महिला स्नेही गाव संकल्पनांवर आधारित काम करत असताना असा ठराव घेऊन कलमठ गावच्या वतीने सावित्रीबाईना खरे अभिवादन असल्याचे मत सरपंच संदीप मेस्त्री यानी व्यक्त केले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पंचायतराज समृद्धी अभियान, आणि शासनाच्या इतर सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेणाऱ्या कलमठ ग्रामपंचायतिने विधवा प्रथा बंदी साठी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायत ने सुरुवातीला विधवा प्रथा बंदीची मोहीम सुरू केली. पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीच्या अंगात वरील मंगळसूत्र काढून घेणे, तिच्या बांगड्या फोडणे आणि तिच्या कपाळा वरील कुंकू पुसणे असे कुप्रकार अनेक गावांमध्ये ते आजही केले जातात. स्त्रीचे सौंदर्य काढून घेणे हा त्यामागचा उद्देश असतो. ही प्रथा बंद करण्याचा ठराव हेरवाड ग्रामपंचायत ने घेतल्यानंतर राज्य शासनाने त्याची दखल घेत सर्वच ग्रामपंचायतीने असा ठराव घ्यावा आणि विधवा प्रता बंद करावी असा निर्णय घेतला.

राज्य शासनाच्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!