*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन संपन्न*
*कणकवली: वार्ताहर*
*वाचा सविस्तर बातमी👇*
समाजातील युवक युवतींनी तंबाखू व अंमली पदार्थ मुक्तीचे भान ठेवून आपले चांगले वर्तन ठेवले पाहिजे. या उद्देशाने कनेडी येथील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रमोद विनायक लिमये, निवृत्त विस्तार आरोग्य अधिकारी, रोटरी क्लब कणकवली यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी यांनी प्रास्ताविक करत पाहुण्यांचे स्वागत केले. भारत हा तरुणांचा देश आहे. वय वर्ष १८ ते २५ युवा शक्ती भारतात सर्वांत जास्त आहे. कोणताही देश हा चांगल्या विचाराने बदलत असतो. दि.१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आता पर्यंत मानवाने अनेक शोध लावले. पण मानव समाधानी नाही, त्यामुळे नितीमुल्यांचा ऱ्हास, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिली नाही. सर्वत्र गुन्हेगारी वृत्तीचे प्रमाण वाढले आहे त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि व्यसनाधिनता वाढली, चांगले-वाईट यातील फरक कळत नाही. जे शाळेत शिकवले जाते ते समाजात घडत नाही, जे समाजात घडते ते शाळेत शिकवले जात नाही. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ घातक आहेत. तंबाखुत निकोटिन व विविध रासायनिक घटक असतात. निकोटिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, नपुसकत्व व वंधत्व येते तसेच कॅन्सर आणि शरीराचे अनेक आजार होतात. निसर्गातील रानमेवा पाने, फुले, फळे या पासून मद्य बनवली जाते. संपूर्ण शरीरावर मद्याचा परिणाम होतो. मुत्र पिंड, यकृत, स्वादुपिंड निकामी होतात. तसेच अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात घातक असतात. त्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो. जीवनात सत्व, वागण्यात तत्व, जगण्यात ममत्व असेल तर मानवी जीवन सुखकर होईल असे यावेळी श्री. प्रमोद लिमये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या कार्यक्रमासाठी श्री. गुरुनाथ पावसकर, रोटरी क्लबचे खजिनदार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. प्रसाद मसुरकर सर यांनी केले. तर श्री. प्रशांत माने सर यांनी आभार मानले

