*कोकण Express*
*उपर्यांना शिवसेना वर्धापनदिनाची व्याख्या समजली नाही!*
*माजी आम.परशुराम उपरकर यांची टीका…!*
*नाईक यांनी स्वत:च्या पंपावर पेट्रोल का दिले नाही?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल व भाजपा सदस्याला एक लिटर मोफत पेट्रोल देण्याचे जाहीर केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त नाईक यांनी अशाप्रकारे उपरोधिक निर्णय घेऊन राडा घालण्यापेक्षा स्वतःच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल द्यायला हवे होते. मात्र तसे न करता कुडाळ येथील दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरून हे पेट्रोल देण्याचे जाहीर करत त्यांनी राड्याचा नवीन पायंडा पाडला असल्याची टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज केली.
श्री.उपरकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना लोकोपयोगी काम करते. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज वर लोकोपयोगी कामे होत आली. मात्र बाहेरून आलेल्या उपऱ्याना शिवसेनेच्या वर्धापन दिनाची व्याख्या समजली नाही आणि त्यामुळेच कुडाळ सारख्या राड्याचा प्रसंग शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आला हे अत्यंत दुर्दैवी आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आजवर लोकोपयोगी कामे होतात. आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे काम होण्याची गरज असताना श्री. नाईक यांनी महागाईच्या विरोधातील हे नवे चित्र दाखवून दिले. मात्र वाढलेली महागाई ही केंद्राबरोबरच राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. दोन्ही सरकारांनी महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ते होताना दिसत नाही. मात्र असे असताना कोरोनाच्या काळात वर्धापन दिनाच्या निमित्ताने राडा घालण्यात आला हा दुर्दैवी आहे.
कोरोनाच्या काळात केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अशी आंदोलने करणे म्हणजे जनतेच्या पदरात धोंडा देण्याचा प्रकार आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना कदापि मान्य नाही. शिवसेनेने ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली आणि आज आज वर्धापन दिन साजरा केला जातो, त्या मूळ उद्देशालाच फाटा देण्याचा हा प्रयत्न आहे. या उपऱ्याना शिवसेना कळलीच नाही असे या निमित्ताने म्हणावे लागेल असे श्री उपरकर यांनी म्हटले आहे.
