सावंतवाडी रुग्णालयाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयात जागेचा वाद मिटला

सावंतवाडी रुग्णालयाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयात जागेचा वाद मिटला

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी रुग्णालयाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयात जागेचा वाद मिटला*

*३ महिन्यात कामाला सुरुवात होणार ; ८० कोटींचा नवा आराखडा*

*सावंतवाडी  : प्रतिनिधि*

बहुप्रतिक्षित सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर पूर्णपणे निकाली निघाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात राजघराण्याच्या दोन्ही सदस्यांमध्ये झालेल्या तडजोडीमुळे रुग्णालयाच्या उभारणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. या यशामध्ये न्यायालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून, याचे खरे श्रेय न्यायालयालाच जाते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
​सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन न्यायालयाने तातडीने ५१ गुंठे जागा चार आठवड्यांत राजघराण्याला हस्तांतरित करण्याचे आणि उर्वरित जागेवर शासनाने मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील न्यायालयीन आदेश प्राप्त होताच रुग्णालयाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकरणात ॲड. शिरीष हिरे यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली, त्याबद्दल आमदार केसरकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच, राजघराण्याचे सदस्य राजेसाहेब खेमसावंत, युवराज आणि श्री. व सौ. भोगले घराण्याने वेळेवर प्रतिज्ञापत्रे सादर करून सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
​वार्षिक सुमारे १० हजार रुग्णांना उपचारासाठी गोव्याला न्यावे लागते आणि यात अनेकांना प्राण गमवावे लागतात, या गंभीर परिस्थितीचा न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करून हा तातडीचा निर्णय दिला आहे. जागेचा प्रश्न मिटल्यामुळे येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. पूर्वी या रुग्णालयासाठी ३८ कोटी रुपये मंजूर होऊन टेंडर निघाले होते, परंतु आताच्या बदललेल्या दरांनुसार ८० कोटी रुपयांचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल. ही नवी इमारत सात मजली असणार असून त्यात १०० बेडची सोय असेल. तसेच या रुग्णालयात कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, हृदयरोग आणि युरॉलॉजी यांसारख्या गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
​सावंतवाडी शहराला इको-सेंसिटिव्ह झोनमधून वगळण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या हरकती नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. इको-सेंसिटिव्ह झोन लागू झाल्यास शहराचा विकास पूर्णपणे थांबेल. यापूर्वीही हरकती नोंदवण्यात आल्या होत्या, मात्र आता पुन्हा एकदा सर्व नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होऊन आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!