रोबोटिक्समध्ये तोरसोळे शाळेची राज्यात दमदार कामगिरी..!

रोबोटिक्समध्ये तोरसोळे शाळेची राज्यात दमदार कामगिरी..!

*कोंकण एक्सप्रेस*

*रोबोटिक्समध्ये तोरसोळे शाळेची राज्यात दमदार कामगिरी..!*

*​’सिंधु रोबो वॉरियर्स’ संघाने पटकावला द्वितीय क्रमांक*

*ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान कौशल्याने सिंधुदुर्गची मान उंचावली*

*शिरगांव : संतोष साळसकर*

भारतीय ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रोबोस्टोर्म्स टेक्नॉलॉजी प्रा. लि., कोल्हापूर’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय शालेय रोबोटिक्स इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ या प्रतिष्ठित स्पर्धेत देवगड तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, तोरसोळे च्या ‘सिंधु रोबो वॉरियर्स’ संघाने चमकदार कामगिरी करत जिल्हा परिषद शाळा गटात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

​कल्पक सादरीकरणाने वेधले लक्ष-

या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील महानगरपालिका शाळा, सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळा तसेच अटल व स्टेम (STEM) लॅब गटांतील शाळांचा सहभाग होता. तोरसोळे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या नावीन्यपूर्ण रोबोटिक्स प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण करत तज्ज्ञ परीक्षण समितीचे लक्ष वेधून घेतले. या यशामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानविषयक उच्च क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

​नावीन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा

तोरसोळे शाळेने यापूर्वीही रोबोटिक्स स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी बंगलोर आणि गोवा येथे राज्यबाहेरील शैक्षणिक अभ्यास दौरेही केले आहेत. केवळ कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर शाळेत संगणक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक नावीन्यपूर्ण व आधुनिक पद्धतीने राबवली जाते.

​सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव-

शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, जिल्हा परिषद सदस्या शीतल तावडे, सरपंच तेजस्विनी पवार, उपसरपंच सुहास (बंटी) पवार, देवगड गटशिक्षणाधिकारी श्री मुकुंद शिनगारे, तोरसोळे केंद्रप्रमुख श्री बापू खरात आणि मुख्याध्यापक श्री सत्यवान चव्हाण यांनी मार्गदर्शक शिक्षक किरण पवार यांच्यासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. या यशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची शैक्षणिक वर्तुळात मान उंचावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!