‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ला केंद्र सरकारची डिझाइन नोंदणी

‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ला केंद्र सरकारची डिझाइन नोंदणी

*कोंकण एक्सप्रेस*

*संशोधन क्षेत्रात मोठी भरारी*

*‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ला केंद्र सरकारची डिझाइन नोंदणी*

*वेंगुर्ला : प्रतिनिधि*

प्राचार्य (प्रो) डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी, डॉ. वसंतराव पाटोळे आणि विद्यार्थी संशोधक मनीष धनराज गोस्वामी यांच्या संशोधनाला राष्ट्रीय मान्यता

संशोधन क्षेत्रात वेंगुर्ल्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य (प्रो) डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी, डॉ. वसंतराव मारुती पाटोळे आणि विद्यार्थी संशोधक मनीष धनराज गोस्वामी यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या ‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ या नाविन्यपूर्ण डिझाइनला केंद्र सरकारकडून अधिकृत डिझाइन नोंदणी मिळाली आहे. पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रक कार्यालयाने या डिझाइनला नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे.ग्रामीण भागातील महाविद्यालयातून झालेल्या या संशोधनाला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मान्यता ही विशेष उल्लेखनीय बाब ठरली आहे.
वर्तनात्मक अभ्यासामध्ये एखाद्या जीवाच्या वर्तनातील बदल, त्याच्या प्रतिक्रिया आणि विविध परिस्थितींमधील प्रतिसाद यांचा अभ्यास केला जातो. अशा प्रयोगांसाठी सुरक्षित, नियंत्रित आणि गरजेनुसार बदल करता येणारी प्रयोग व्यवस्था आवश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन ‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ची निर्मिती करण्यात आली आहे.
या चेंबरची रचना मॉड्युलर पद्धतीची असल्याने वेगवेगळ्या प्रयोगांच्या गरजेनुसार त्यात आवश्यक बदल करता येतात. त्यामुळे संशोधकांना प्रयोग अधिक सुलभ पद्धतीने करता येतात. निरीक्षणातील अचूकता वाढविणे, प्रयोगातील त्रुटी कमी करणे आणि मिळालेल्या माहितीचा व्यवस्थित अभ्यास करणे यासाठी हे डिझाइन उपयुक्त ठरू शकते. मानसशास्त्र, प्राणीशास्त्र, जैविक विज्ञान आणि वर्तनात्मक अभ्यासाशी संबंधित विविध संशोधनांमध्ये त्याचा उपयोग होण्यास मदत होणार आहे.
या डिझाइनची भारत सरकारच्या डिझाइन्स ॲक्ट, २००० आणि डिझाइन्स रूल्स, २००१ नुसार Class 24-02 अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. डिझाइन क्रमांक 492501-001, तर नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक 248362 आहे. या डिझाइनची नोंदणी सुरुवातीला दहा वर्षांसाठी वैध असून, नियमानुसार पुढील पाच वर्षांसाठी तिचा कालावधी वाढविता येतो.
या संशोधनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी संशोधक यांनी एकत्रितपणे केलेले संशोधनकार्य होय. प्राचार्य (प्रो) डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. वसंतराव पाटोळे यांच्या सहकार्याने विद्यार्थी संशोधक मनीष धनराज गोस्वामी यांनी या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष संशोधन प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे हे उदाहरण प्रेरणादायी ठरले आहे.
या संशोधनात डॉ. सुवर्णा कदम, डॉ. मिनाक्षी गुरव, श्री. मकरंद करवाल, डॉ. सचिन साळवे आणि श्री. कृष्णा बेलदार यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्व संशोधकांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे नाविन्यपूर्ण डिझाइन विकसित झाले असून, त्याला केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे.
संशोधनामध्ये अचूक निरीक्षण आणि योग्य माहिती मिळविण्याला मोठे महत्त्व आहे. वर्तनात्मक अभ्यासाच्या क्षेत्रातही प्रयोगासाठी योग्य साधने उपलब्ध असणे गरजेचे आहे. या दृष्टीने ‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात या डिझाइनमध्ये आणखी सुधारणा करून विविध प्रकारच्या संशोधनासाठी त्याचा वापर वाढविता येण्याची शक्यता आहे.
वेंगुर्ल्यासारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी संशोधक यांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणे ही अभिमानाची बाब आहे. या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरणा मिळणार असून, नव्या कल्पना आणि संशोधनात्मक उपक्रमांना निश्चितच चालना मिळणार आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, अध्यक्षा शिवानी देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई आणि प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे आणि सर्व प्राध्यापक यांनी प्राचार्य डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी, डॉ. वसंतराव पाटोळे आणि विद्यार्थी संशोधक मनीष धनराज गोस्वामी यांच्यासह संपूर्ण संशोधक चमूचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सामाजिक क्षेत्रातूनही संशोधकांचे कौतुक होत आहे. या उल्लेखनीय संशोधनामुळे वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!