*कोंकण एक्सप्रेस*
*जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते पाट वरचावाडा केंद्रशाळेच्या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न*
*पाट (प्रतिनिधी) :*
ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार व अद्ययावत शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रशाळा पाट वरचावाडा येथे आयोजित करण्यात आलेला भूमिपूजन सोहळा गुरुवारी अत्यंत उत्साहात पार पडला.
या महत्त्वपूर्ण विकासकामाच्या प्रारंभप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना दादा साईल म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि बालकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, याच उद्देशाने या विकासकामांचा शुभारंभ होत आहे. भविष्यातही या शाळेच्या आणि परिसराच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध असू.”
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, सौ. आरती पाटील, सौ. यज्ञा साळगावकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, केंद्रशाळेचे शिक्षक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या या नवीन विकासकामामुळे परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमास आणि शाळेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

