वायरी-भूतनाथच्या विकासकामांना मिळणार चालना; शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत यांचा पाहणी दौरा

वायरी-भूतनाथच्या विकासकामांना मिळणार चालना; शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत यांचा पाहणी दौरा

*कोंकण एक्सप्रेस*

*वायरी-भूतनाथच्या विकासकामांना मिळणार चालना; शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत यांचा पाहणी दौरा*

*मालवण : प्रतिनिधी*

वायरी-भूतनाथ गावातील विविध प्रलंबित विकासकामांच्या मागणीसाठी व त्याबाबतच्या पाठपुराव्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय श्री दत्ता सामंत साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर सामंत साहेबांनी वेळात वेळ काढून शिवसेना तालुका प्रमुख श्री मंदार लुडबे यांना सोबत घेऊन वायरी-भूतनाथ गावाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

या दौऱ्यात बोडवे वाडी घाटी रस्ता या महत्त्वाच्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. वाढत्या पर्यटनाच्या दृष्टीने ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यासाठी हा रस्ता फायदेशीर ठरणार आहे या रस्त्यासाठी कोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देता येईल, तसेच भविष्यात हा रस्ता अधिक चांगल्या व मोठ्या मार्गामध्ये विकसित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश सामंत साहेबांनी दिले.

त्यानंतर माननीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या निधीतून सुरू असलेल्या वायरी-भूतनाथ स्मशानभूमीच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. कामाची पाहणी करून एकूण परिस्थिती समाधानकारक असल्याची खात्री करण्यात आली. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक नसलेला मोकळा भाग व लेव्हलिंगचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी आवश्यक लेव्हलिंग करून लवकरच पेव्हर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन सामंत साहेबांनी दिले.

गावातील स्थानिक तरुणांची अनेक दिवसांपासून असलेली व्यायामशाळेची मागणी देखील यावेळी सामंत साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तात्काळ संबंधित सीओ यांच्याशी संपर्क साधून भूतनाथ शाळेतील दोन वर्गखोल्या व्यायामशाळेसाठी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव सादर करण्यास सांगून पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर सामंत साहेबांनी स्वयंभू श्री भूतनाथ मंदिराला भेट देऊन स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिराच्या मानकरी मंडळाशी चर्चा केली. मंदिराच्या पुनर्रचनेबाबत तसेच सभामंडपापासून पुढील नवीन बांधकाम करण्याबाबत मानकरी मंडळाने विविध सूचना व मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सभामंडपाचे मोजमाप घेऊन योग्य वास्तुविशारदाकडून मंदिराच्या पुढील विकासासाठी सुसंगत आराखडा तयार करून घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपलब्ध पर्यायांचा विचार करून मंदिराच्या विकासाची पुढील दिशा निश्चित करण्याचे आश्वासन सामंत साहेबांनी दिले.

याशिवाय गावातील इतर विविध विकासात्मक कामांबाबतही ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सामंत साहेबांच्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यामुळे अनेक प्रलंबित कामांना आता गती मिळेल आणि गावाच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

सामंत साहेबांच्या या दौऱ्यामुळे वायरी-भूतनाथमधील स्थानिक नागरिक व तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले. ग्रामस्थांनी त्यांच्या तत्पर प्रतिसादाबद्दल व विकासकामांसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या पाहणी दौऱ्यावेळी गावातून श्री. देवानंद लोके गावकर, श्री. कृष्णा देवुलकर, श्री. काशनाथ मांजरेकर, श्री. मनोहर पाटकर, श्री राजन चव्हाण,श्री. मुन्ना झाड, श्री. विकी लोके गावकर, श्री. किरन बोडवे, श्री. जीवन मसुरकर, श्री. वैभव मसुरकर, ग्रामपंचायत सदस्य विकास मसुरकर, श्री. चैतन्य बोडवे, श्री. साहिल बोडवे, श्री. गजानन बोडवे, श्री. प्रथमेश बोडवे, श्री. अक्षय देऊलकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.

वायरी-भूतनाथच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेल्या या सकारात्मक पाठपुराव्यामुळे गावातील विविध विकासकामांना निश्चितच नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!