हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे – पालकमंत्री नितेश राणे

हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे – पालकमंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे – पालकमंत्री नितेश राणे*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन*

*स्थानिक नागरिकांनासह पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक*

*सिंधुदुर्ग, दि. १०* 

जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असून, व्यवसायिकांनी प्रशासनाच्या तपासणी व कार्यवाहीस आवश्यक ते सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्या व कारवाया या संबंधित कायदे, नियम आणि निर्धारित प्रक्रियेनुसारच करण्यात येत आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६, तसेच त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियम व विनियमांच्या आधारे अन्न व्यवसायांची तपासणी, नमुने घेणे, आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही आदी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने कारवाईबाबत गैरसमज न ठेवता आपल्या आस्थापनेतील त्रुटी दूर करून नियमांचे पालन करण्यास प्राधान्य द्यावे.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यातील हॉटेल आणि खाद्य व्यवसायांना विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याचे कारण नाही; मात्र नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कायद्यानुसार कार्यवाही होणे अपरिहार्य आहे.

*व्यावसायिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?*

हॉटेल व खाद्य व्यवसायिकांनी आपल्या आस्थापनेचा एफएसएसएआय परवाना/नोंदणी वैध असल्याची खात्री करून त्याचा क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित करावा. एफएसएसएआयच्या नियमानुसार खाद्य व्यवसायासाठी परवाना/नोंदणी आवश्यक आहे.

स्वयंपाकघर, अन्नसाठवणूक जागा, भांडी, उपकरणे आणि परिसराची नियमित स्वच्छता ठेवावी. कच्चे व शिजवलेले अन्न स्वतंत्रपणे ठेवावे. अन्नपदार्थ झाकून ठेवावेत तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी. दूषित, खराब किंवा मुदतबाह्य कच्चा माल अथवा अन्नपदार्थ वापरू नयेत. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी योग्य तापमान व स्वच्छ साठवणूक पद्धतीचा अवलंब करावा.

खाद्य व्यवसायिकांनी अन्नपदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी विश्वसनीय स्त्रोतांकडून करावी आणि आवश्यक खरेदी नोंदी, बिल तसेच संबंधित कागदपत्रे व्यवस्थित जतन करावीत. अन्न व्यवसायातील स्वच्छता व सुरक्षिततेसाठी एफएसएसएआयच्या शेड्यूल 4 मधील स्वच्छता व आरोग्यविषयक आवश्यकतांचे पालन करणे अपेक्षित आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य खाद्य आस्थापनांनी स्वच्छ पिण्याचे पाणी, योग्य कचरा व्यवस्थापन, कीटक नियंत्रण, स्वच्छ शौचालय व्यवस्था आणि स्वच्छ खाद्य हाताळणी व्यवस्था याकडे विशेष लक्ष द्यावे. अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेचीही नियमित काळजी घ्यावी.

*नियमांचे पालन हाच कारवाईपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग – सहायक आयुक्त ललित गायकवाड*

जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यवसायिकांनी तपासणी होण्याची वाट न पाहता स्वतःच्या आस्थापनेची नियमित तपासणी करावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नसुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे स्वेच्छेने पालन करावे.

*जिल्ह्यात एकूण ८२ तपासण्या*

माहे एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ अखेर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यात एकूण ८२ तपासण्या करण्यात आल्या असून, ४७ नमुने घेण्यात आले आहेत. यामध्ये १९ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून १२ व्यवसाय बंद नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारवाईतून एकूण १ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच विभागाकडे प्राप्त झालेल्या ३३ तक्रारींपैकी ३० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. गुटखा कारवाई अंतर्गत ६ कारवाया करण्यात आल्या असून, या कारवाईमध्ये एकूण २२ लाख २४ हजार ९६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

००००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!