*कोंकण एक्सप्रेस*
*”भारुड महोत्सव २०२६” चे नांदगाव तिठा येथे ९ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन*
*लोककलेचे जतन व संवर्धनाचा संकल्प..!*
*कणकवली : संजना हळदिवे*
कोकणातील लोकप्रबोधन, समाजप्रबोधन आणि अध्यात्माचा प्रभावी माध्यम असणाऱ्या भारुड कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने *’कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थे’*च्या वतीने “भारुड महोत्सव – २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक व आध्यात्मिक सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत नांदगाव तिठा (नांदगाव) येथे पार पडणार आहे, अशी माहिती संस्थेचे तालुकाध्यक्ष प्रकाश सखाराम पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पारंपरिक लोककलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील भारुड या लोककला प्रकारातून रामायण, महाभारत, पुराणग्रंथ आणि ऐतिहासिक कथांतील विविध प्रसंग अत्यंत रंजक व विचारप्रवर्तक शैलीत मांडले जातात. समाजाला नैतिकता, संस्कार, भक्ती आणि जीवनमूल्यांचा संदेश देणारी ही कला बदलत्या काळात लोप पावू नये, नव्या पिढीपर्यंत हा सांस्कृतिक वारसा पोहोचावा आणि भजनी बुवांचा भारुडाकडे कल वाढावा, या उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांना प्रमुख निमंत्रण
या महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेशजी राणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारून महोत्सवाला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
संस्थेचे सातत्यपूर्ण सामाजिक व सांस्कृतिक कार्य
२००९ मध्ये स्थापन झालेल्या कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेने आजवर भजनी व मृदुंग वादन कार्यशाळा, भजन स्पर्धा, कलाकारांचा गुणगौरव, शासनस्तरावर पाठपुरावा आणि गरजू कलाकारांना आर्थिक मदत असे अनेक स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत.
उपस्थितांचे आवाहन
या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध नामवंत भारुड कलाकार आणि भजनी बुवा यांचे दर्जेदार सादरीकरण होणार आहे. तरी सर्व भजनप्रेमी, भारुड रसिक, वारकरी बांधव व नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस उपस्थित मान्यवर:
या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष प्रकाश पारकर यांच्यासह उपाध्यक्ष मारुती मेस्त्री, सचिव निलेश ठाकूर, खजिनदार सुदर्शन फोपे, सहसचिव मयूर ठाकूर, चंद्रशेखर चव्हाण, मंगेश खाडये, लक्ष्मण बागवे, चंद्रकांत गुरव, श्रीकांत शिरसाट, पंढरी जाधव, महानंदा चव्हाण व इतर सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

