कुक्कुटपालनातून आर्थिक उन्नती साधा; महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा – डॉ. तुषार वेर्लेकर

कुक्कुटपालनातून आर्थिक उन्नती साधा; महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा – डॉ. तुषार वेर्लेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*कुक्कुटपालनातून आर्थिक उन्नती साधा; महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा – डॉ. तुषार वेर्लेकर*

*लोरे नं.1 ग्रा.पं.च्या वतीने महिलांसाठी कुक्कुटपालन मार्गदर्शन शिबीर संपन्न*

*फोंडाघाट : संजना हळदिवे*

लोरे नंबर १ ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन लोरे शाळा नंबर १ येथे करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांनी कुक्कुटपालन हा व्यवसाय केवळ जोडधंदा म्हणून न पाहता आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊन तो एक फायदेशीर उद्योग म्हणून विकसित करावा, असे प्रतिपादन मार्गदर्शक डॉ. तुषार वेर्लेकर यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित महिलांना कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात कशी करावी, पक्ष्यांची निवड, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छता, विपणन तसेच शासनाच्या विविध अनुदान योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्यास कमी गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवता येते, असेही डॉ. वेर्लेकर यांनी सांगितले.


लोरे सरपंच अजय रावराणे यांनी उपस्थित महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करताना, “घरच्या घरी सुरू करता येणारा कुक्कुटपालन व्यवसाय ग्रामीण महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो. समूहाच्या माध्यमातून व्यवसाय केल्यास बाजारपेठ मिळविणे अधिक सोपे होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा उद्योग उभारावा,” असे आवाहन केले. प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या प्रत्येक महिलाभगिनीला ऑक्टोबर महिन्यात 1 महिना वाढ झालेली कोंबडी पक्षी ग्रामपंचायत च्या वतीने मोफत देण्यात येणार असून शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करेल असेही आश्वस्त केले.
या मार्गदर्शन शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे समाधान करत प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये कुक्कुटपालन व्यवसायाबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून अनेक महिलांनी हा व्यवसाय सुरू करण्याची तयारी दर्शविली.
लोरे नंबर १ ग्रामपंचायतीने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविलेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी उपसरपंच रसिका राणे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राहुल कलढोने,ग्रा पं सदस्य सुमन गुरव, महिला बचत गटाच्या पदाधिकारी तसेच गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!