कणकवलीतील ५३ हजारांची घरफोडी उघडकीस

कणकवलीतील ५३ हजारांची घरफोडी उघडकीस

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीतील ५३ हजारांची घरफोडी उघडकीस*

*विरारमधून सराईत चोरटा जेरबंद, एलसीबीची धडक कारवाई*

*​कणकवली : संजना हळदिवे*

ओटव (ता. कणकवली) येथे जुलै महिन्यात झालेली घरफोडीची घटना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यशस्वीरीत्या उघडकीस आणली आहे. याप्रकरणी विरार येथून सराईत आरोपी राजू तुकाराम सुतार याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले मोबाईल आणि स्मार्ट वॉच हस्तगत करण्यात आले आहेत.
​घरफोडीची पार्श्वभूमी
​दिनांक १७ जुलै २०२६ रोजी ओटव येथील दिनेश शशिकांत कोरगांवकर आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नितेश रमेश देवळे यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला होता. घरातून रोख रक्कम, २ मोबाईल फोन, एटीएम कार्ड, स्मार्ट वॉच आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ५३,१०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी १८ जुलै रोजी कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
​विरार येथे सापळा रचून आरोपीला बेड्या
​सदर अ-उघड गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत होते. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली.
​आरोपी राजू तुकाराम सुतार (वय ३५ वर्षे, मूळ रा. नाधवडे, ता. वैभववाडी; आधार कार्डवरील पत्ता: कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, काळंबा; सध्या रा. श्रमनिवास सोसायटी, विरार पूर्व) हा विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने तात्काळ विरार येथे जाऊन त्याच्या राहत्या घरावर छापा मारला व ५ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
​आरोपीचा मोठा गुन्हेगारी इतिहास
​ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राजू सुतार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत:
​कोल्हापूर (वडगाव पोलीस ठाणे): गु.र.नं. ६०३५/२०१५, ६०५८/२०१५
​कोल्हापूर (जुना राजवाडा पोलीस ठाणे): गु.र.नं. ११५/२०१४, १४९/२०१४
​सांगली (विश्रामबाग पोलीस ठाणे): गु.र.नं. १४८/२०१४, १६०/२०१४, १७७/२०१४, १८०/२०१४
​सिंधुदुर्ग (वैभववाडी पोलीस ठाणे): गु.र.नं. ३३/२००७
​मुंबई (आग्रीपाडा पोलीस ठाणे): गु.र.नं. २७५/२०२२
​पुढील कारवाई आणि पोलीस पथक
​आरोपीची वैद्यकीय तपासणी करून, चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल व स्मार्ट वॉचसह त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
​सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर यांच्या सूचनेनुसार व श्री. प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सनिल पाटील, ASI/903 राजेंद्र जामसंडेकर, HC/722 ज्ञानेश्वर तवटे आणि HC/731 किरण देसाई यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!