दोडामार्ग–विजघर रस्ता बनला मृत्यूचा सापळा; तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा

दोडामार्ग–विजघर रस्ता बनला मृत्यूचा सापळा; तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग–विजघर रस्ता बनला मृत्यूचा सापळा; तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा*

*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस*

*दोडामार्ग : शुभम गवस*

दोडामार्ग–विजघर रस्त्यावरील काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभारामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याची तीव्र नाराजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस यांनी व्यक्त केली आहे.

मेढे परिसरात रस्ता खोदून तसाच ठेवण्यात आल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या एका बाजूला सुमारे एक ते दीड फूट खोल चर पडलेला असून त्यामुळे रस्ता दोन भागांत विभागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला असून रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी सावधगिरीचे फलक, रिफ्लेक्टर किंवा अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नवख्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढल्याची बाब बाबू गवस यांनी निदर्शनास आणून दिली.

दोडामार्ग ते भेडशी मार्गावरील काही भागात सूचना दिल्यानंतर रस्ता काही प्रमाणात सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आवाडे ते विजघर या पट्ट्यात वाहनचालकांच्या सुरक्षिततेकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस यांनी संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, खोदलेले भाग भरून वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित करावा तसेच आवश्यक इशारा फलक व रिफ्लेक्टर त्वरित बसवावेत, अशी मागणी केली आहे.

अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर लवकरच अचानक रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बाबू गवस यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!