ज्येष्ठ नेते शिवाजी कुबल काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ नेते शिवाजी कुबल काळाच्या पडद्याआड

*कोंकण एक्सप्रेस*

*ज्येष्ठ नेते शिवाजी कुबल काळाच्या पडद्याआड*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला-कुबलवाडा येथील रहिवासी, ज्येष्ठ नेते, वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल (वय 87) यांचे गुरूवार दि.23 जुलै रोजी रात्री 8.30च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पुतणे, पुतणी, भावजया, नातवंडे असा परिवार आहे.
शिवाजीदादा हे हे वेंगुल्र्यातील ज्येष्ठ नेते होते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे जवळचे निकटवर्तीय होते. तर विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे ते मार्गदर्शक होते. ज्या ज्या वेळी शरद पवार वेंगुल्र्यामध्ये येत त्या त्या वेळी ते शिवाजी कुबल यांची भेट घेत. वयाच्या 26व्या वर्षी ते वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यावेळी नगरपरिषदेला स्वच्छता अभियानात पुरस्कारही मिळाले होते. प्रसिद्ध आंबा बागायतदार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांना राज्यसरकारचा कृषिभूषण आणि कृषिरत्न असे अनेक पुरस्कारही मिळाले होते. दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे ते 15 ते 20 वर्षे सिनेट मेंबर होते. तर वेंगुल्र्यातील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या स्थानिक संचालक मंडळाचे ते सदस्य होते.
शुक्रवारी अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात आले होते. आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित रहात त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख अजित राऊळ आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद रेगे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ईशाद शेख, जिल्हापरिषद सदस्य संजय गावडे, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, श्री.कुबल यांचे स्नेही आणि नागरिकांनी उपस्थित रहात त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
यावेळी आमदार केसरकर श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, शिवाजीराव कुबल यांच्या निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाले. ते माझे राजकीय गुरू होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणारे वेंगुर्लेकरांचे लाडके तसेच कोकणच्या मातीशी इमान राखणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते राष्ट्रीय नेते होते. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे खंदे समर्थक व वि·ाास सहकारी म्हणून ते प्रसिद्ध होते. ते फक्त राजकारणीच नव्हते तर एक उत्कृष्ट आंबा बागायतदार होते. कृषी क्षेत्राचे त्यांना सखोल ज्ञान होते. शेती, आंबा बागायती आणि शेतकरी बांधवांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक होते. शेतक-याच्या मुलापासून ते लोकप्रतिनिधीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा कोकणासाठी प्रेरणा आहे.
त्यांच्या निधनाने वेंगुर्ला, कोकण आणि सिंधुदुर्गने एक जाणता नेता, एक मातीशी बांधिल असलेला शेतकरी आणि माणसात मिसळणारा मित्र गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे अशा शब्दांत आमदार केसरकर यांनी शिवाजी कुबल यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!