*कोंकण एक्सप्रेस*
*बोडदे गणेश मंदिराजवळील धोकादायक भगदाड त्वरित बुजवा; सामाजिक कार्यकर्ते अरविंद गवस यांची मागणी*
*दोडामार्ग : शुभम गवस*
बोडदे येथील गणेश मंदिरानजीक मुख्य रस्त्यावरील मोरीला मोठे भगदाड पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भगदाडामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा पावसाळ्यात पाणी साचल्याने हे भगदाड वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच ग्रामस्थांची वर्दळ असते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते अरविंद गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधत मोरीवरील भगदाड तात्काळ बुजवून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या धोकादायक ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

