*कोंकण एक्सप्रेस*
*माजी खासदार विनायक राऊत आणि मुलासह ७ जणांवर गुन्हा दाखल; सुनेचा छळ आणि अघोरी कृत्य केल्याचा खळबळजनक आरोप*
*कणकवली (प्रतिनिधी):*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह एकूण ७ जणांविरुद्ध ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा शारीरिक व मानसिक छळ करणे आणि तिच्यावर अघोरी कृत्य (जादूटोणा) केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी जादूटोणा विरोधी अधिनियम, नरबळी व इतर अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लग्नात फसवणूक आणि परदेश दौऱ्यात मारहाण
विनायक राऊत यांची सून गिरीजा गितेश राऊत यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, लग्न जुळवताना वाकोला येथे स्वतःचा बंगला असल्याची खोटी माहिती राऊत परिवाराकडून देण्यात आली होती. लग्नानंतर महाराष्ट्र, ऊटी तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, दुबई, केनिया आणि थायलंड या देशांत फिरत असताना, पती गितेश राऊत यांना काही खाजगी बाबींबद्दल विचारणा केली असता त्यांनी सातत्याने शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे.
’होम इन्सेमिनेशन’साठी दबाव आणि अघोरी कृत्य
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, पती गितेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम असल्याचे सासरे विनायक राऊत व सासू शामल राऊत यांना माहीत होते, तरीही त्यांनी हा विवाह लावून दिला. तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार देत सासरच्या मंडळींनी गिरीजा यांच्यावर ‘होम इन्सेमिनेशन’चा पर्याय स्वीकारण्यासाठी दबाव आणला. तसेच सासू शामल राऊत यांनी घरकाम आणि देवपूजेवरून मानसिक त्रास दिला, व मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरल्या.
यात भर म्हणून, गिरीजा यांच्यावर ‘बाहेरची बाधा’ असल्याचे सांगून सासरे विनायक राऊत यांच्या सांगण्यावरून विविध बाबा आणि नातेवाइकांच्या मदतीने अघोरी कृत्य व जादूटोणा करण्यात आला.
या ७ जणांवर गुन्हा दाखल:
गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून खालील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. गितेश विनायक राऊत (पती)
२. विनायक राऊत (सासरे, माजी खासदार)
३. शामल विनायक राऊत (सासू)
४. सुरेखा राजेश सरफरे (लग्नाचा मध्यस्थ, गितेश राऊत यांची आत्तेबहीण) व राजेश सरफरे
५. आबा राऊत (चुलत सासरे, रा. भांडुप, मुंबई)
६. फिरोज बाबा (रा. कोलगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग)
७. काझी बाबा (रा. करूड घाट, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आणि हरीशचंद्र घाडी (रा. नानेली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)
पोलीस तपास सुरू:
सुनेचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक छळ केल्याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

