*कोंकण एक्सप्रेस*
*गाबीत समाजाच्या जात दाखल्यांचे अर्ज तातडीने स्वीकारा…*
*जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट…*
*सिंधुदुर्गनगरी*
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असताना गाबीत समाजातील विद्यार्थ्यांना जात दाखले व पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणींवर जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी तातडीने तोडगा काढला आहे. गाबीत समाज महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सर्व अर्ज प्रथम दाखल करून घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
नवीन प्रवेश, शासकीय भरती आणि कर्जासाठी जात दाखल्यांची गरज असताना मालवण व सावंतवाडी सेतू केंद्रांतून अर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारी शिष्टमंडळाने मांडल्या.
किनारपट्टीवर राहणाऱ्या या पारंपरिक मासेमारी समाजाकडे १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे नसणे आणि जुन्या शालेय नोंदींमध्ये ‘मराठा’, ‘आरमारी मराठा’ अशा नोंदी असल्याने अडचणी येत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. यावर गृहचौकशी आणि रक्ताच्या नात्यातील प्रमाणपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात आली. या गंभीर प्रश्नावर येत्या १३ जुलैला जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांसोबत विशेष बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे महासंघ अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर, अन्वय प्रभू, दीपक तारी उपाध्यक्ष बाबाजी तारी उपस्थित होते.

