*कोंकण एक्सप्रेस*
*”निचरा करा, अन्यथा उपोषण!” चेतना गडेकर यांचा इशारा; यंत्रणा तातडीने कामाला…*
*दोडामार्ग : शुभम गवस*
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग-भेडशी मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारक व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या चेतना चित्रसेन गडेकर यांनी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला.
नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधल्यानंतर संबंधित रस्ता रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गडेकर यांनी ठेकेदाराशी थेट संपर्क साधून तातडीने पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली. दुर्लक्ष झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.
यानंतर रस्ते विकास महामंडळाने तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याच्या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, ही समस्या दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता, कल्व्हर्टची देखभाल व निचरा व्यवस्थेची नियमित तपासणी करावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

