*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गचा डंका! संतोष गावडे यांना ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ तर शरद धुरी यांना ‘कृषी भूषण’ पुरस्कार प्रदान*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2026’ यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील प्रगतशील शेतकरी संतोष अंकुश गावडेयांचा सन्मान करण्यात आला तर झाराप येथील शरद गणपत धुरी यांना वसंत राव नाईक कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या राज्यस्तरीय भव्य कृषी पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यात राज्यातील विविध जिल्ह्यांतील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. सिंधुदुर्गच्या या दोन्ही शेतकऱ्यांनी आधुनिक, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार मंत्री भरतशेठ गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सहसचिव परिमल सिंह तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना संतोष गावडे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माधवी गावडे, बंधू संदीप गावडे, भाचा अजय चव्हाण तसेच सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना संतोष गावडे यांनी, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या अथक परिश्रमाचा आणि कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा सन्मान आहे. महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाचे मी मनःपूर्वक आभार मानतो, अशी भावना व्यक्त केली.

