सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाशेजारील सार्वजनिक विहिरीचा गाळ उपसला; रुग्णांना मिळणार स्वच्छ व निर्जंतुक पाणी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाशेजारील सार्वजनिक विहिरीचा गाळ उपसला; रुग्णांना मिळणार स्वच्छ व निर्जंतुक पाणी

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाशेजारील सार्वजनिक विहिरीचा गाळ उपसला; रुग्णांना मिळणार स्वच्छ व निर्जंतुक पाणी!*

​*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपालिकेकडून विहिरीची स्वच्छता*

​*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारी सिद्धी वाडा येथे असलेली नगरपालिकेची सार्वजनिक विहीर कित्येक वर्षांनी स्वच्छ करण्यात आली आहे. विहिरीतील संपूर्ण गाळ उपसून पाणी निर्जंतुक करण्यात आले असून, यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेशी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाले असल्याची माहिती स्वतः मसूरकर यांनी दिली आहे.
​…आणि रुग्णालयाचा पाणीप्रश्न सुटला!
​सुमारे ७ ते ८ वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील असताना रुग्णालयात पाण्याचा तीव्र तुटवडा भासत होता. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरून प्रशासनावर आरोपही केले होते. ही गंभीर समस्या ओळखून राजू मसूरकर यांनी पुढाकार घेतला. रुग्णालयापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या या सार्वजनिक विहिरीवरून पंप बसवून आणि पाईपलाईनद्वारे रुग्णालयात पाणी आणण्याची योजना त्यांनी आखली. यासाठी त्यांनी तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता व रुग्णालयाचा पाणीप्रश्न कायमचा दूर केला होता.
​अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना बसेल आळा
​”आरोग्य क्षेत्रात रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याने मला याचा प्रदीर्घ अनुभव आहे,” असे सांगत राजू मसूरकर म्हणाले की, “विहिरीचा गाळ दर ३ ते ४ वर्षांनी उपसणे अत्यंत गरजेचे असते. अशुद्ध पाण्यामुळे टायफॉइड, काविळ, डायरिया (सतत संडास होणे) यांसारखे गंभीर आजार उद्भवतात आणि उपजिल्हा रुग्णालयात अशा आजारांचे अनेक रुग्ण नेहमीच आढळतात.”
​पुढे बोलताना त्यांनी नागरिकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला, की “विहीर उपसल्यानंतर पाणी शुद्ध व स्वच्छ राहण्यासाठी त्यात १ शेर खडे मीठ आणि अर्धा किलो तुरटी टाकणे आवश्यक असते. आजकालच्या युवकांना किंवा नागरिकांना याची माहिती नसते, त्यामुळे अशुद्ध पाण्याचे प्रकार घडतात. सर्वांनीच आरोग्याची अशी खबरदारी घेतली पाहिजे.”
​सहकार्य करणाऱ्यांचे मानले आभार
​ही विहीर स्वच्छ करून रुग्णांची गैरसोय दूर केल्याबद्दल सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, तसेच आरोग्य निरीक्षक विनोद सावंत आणि दीपक म्हापसेकर यांनी विशेष सहकार्य केले. या सर्वांचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, सर्व रुग्ण आणि जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष राजू मसूरकर यांनी जाहीर आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!