कोकणातील आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

कोकणातील आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणातील आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय*

*मुंबई, दि. २१ :*

कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक नुकसान झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई व दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजी होणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक संकटांचा सामना करत असताना उत्सव साजरा करण्यापेक्षा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे श्री. नितेश राणे यांनी म्हटले आहे. समाजातील दुःख आणि अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात त्यांनी आपल्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे. त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात आणि परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

विशेषतः ‘गो-सेवा’ आणि गौसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करताना श्री. नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या संस्कारातून गौमातेची सेवा, गोशाळांना मदत, जनावरांच्या संगोपनासाठी योगदान तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. गरीब, गरजू आणि वंचित घटकांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रम हेच वाढदिवस साजरा करण्याचे खरे स्वरूप असल्याचे त्यांनी नमूद केले.

“कोकणातील बागायतदारांचे नुकसान, मच्छीमार बांधवांची परवड आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वैयक्तिक आनंदोत्सवाला फाटा देणे आवश्यक आहे. जनतेच्या दुःखात सहभागी होणे आणि सेवाभावातून समाजकार्यात योगदान देणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल,” असे श्री. नितेश राणे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राज्यातील कठीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्याची चळवळ उभी राहण्यास या आवाहनामुळे निश्चितच चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

“तुमचा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल,” असे सांगत श्री.नितेश राणे यांनी सर्वांना समाजकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!