मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे*

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे*

*कोंकण एक्सप्रेस*

*मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे*

*राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित!*

*मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात;*

*धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका*

*कणकवली ः संजना हळदिवे*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत जागतिक पातळीवर सर्वात सुरक्षित राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखाली देश आता अमेरिका, चीननंतर तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत झाला असून हिंदू समाजाला विकास आणि प्रशासनाच्या केंद्रस्थानी आणले असल्याचा दावा ही त्यांनी केला.

कणकवली प्रहार भवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मोदी@१२ अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई, सिंधुदुर्ग भाजप जिल्हा सरचिटणीस,संदीप साटम, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष निसार शेख, कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा अध्यक्ष मधु देसाई, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यालय प्रमुख समर्थ राणे आदी उपस्थित होते.

चौकट
२०१४ पूर्वीची स्थिती आणि ‘वोट बँक’ राजकारण

नितेश राणे यांनी २०१४ पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळातील स्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली. “२०१४ अगोदर देशात सणांवर बंदी घातली जात होती. अल्पसंख्याकांना केंद्रित ठेवून, केवळ ‘वोट बँक’ सांभाळण्यासाठी राजकारण केले गेले. अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनामुळे हिंदू समाज आणि त्यांच्या जमिनी असुरक्षित होत्या, तर वफ्फ कायद्यासारख्या जाचक नियमांमुळे अन्याय होत होता. देशात सतत अतिरेकी कारवाया आणि असुरक्षिततेची भावना होती. पूर्वी कधी पंतप्रधान महाआरती करताना दिसले होते का?” असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

चौकट
१२ वर्षांची वाटचाल आणि परिवर्तन

२०१४ नंतर देशात ‘राष्ट्र प्रथम’ हाच विचार नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरू झाली, असे सांगत नितेश राणे म्हणाले, “मोदी सरकारने हिंदू समाजाला केंद्रबिंदू मानून आदरयुक्त स्थान दिले. वर्षानुवर्षे ज्या राम मंदिराची आपण वाट पाहत होतो, ते अयोध्या भव्य राम मंदिर कोणतीही दंगल न घडता शांततेत आणि डौलाने उभे राहिले. काशी विश्वनाथ, उज्जैन कॉरिडॉरचा विकास करून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्यात आली. देशातील धार्मिक स्थळे सुरक्षित करून हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्याचे ऐतिहासिक कायदे मोदी सरकारने केले, ज्यामुळे हिंदू समाजाला खरी ताकद मिळाली.”

चौकट
जागतिक पातळीवर ‘सनातन’ची ओळख व सुरक्षा

पंतप्रधान मोदी हे देशातच नव्हे, तर परदेशातही आपली हिंदू ओळख अभिमानाने घेऊन वावरतात आणि सनातन धर्माला प्रोत्साहन देतात, असे राणे यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, “आज पाकिस्तान किंवा कोणत्याही जिहादी संघटनेची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला, तर ‘ऑपरेशन सिंधूर’ (सर्वोच्च लष्करी प्रत्युत्तर) सारख्या माध्यमातून कडक कारवाई केली जाते. आज भारत जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून ओळखला जातो, हेच मोदींचे सर्वात मोठे योगदान असून देश त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने अग्रेसर राहील.”

चौकट
धार्मिक अस्मितेचे पुनरुत्थान

राम मंदिराचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला आस्थेचा विषय मोदी सरकारने दंगलमुक्त वातावरणात यशस्वीपणे सोडवला. अयोध्या, काशी विश्वनाथ आणि उज्जैन यांसारख्या प्रमुख धर्मस्थळांचा कायापालट करून देशात धार्मिक पर्यटनाचे नवे पर्व सुरू केले. तसेच वफ्फ कायद्याच्या कचाट्यातून हिंदू समाजाला हक्काच्या जमिनी परत मिळवून देत धार्मिक स्थळांना सुरक्षा कवच दिले.

चौकट
जागतिक पटलावर तिसरी महाशक्ती

नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आणि सामरिक शक्तीत मोठी झेप घेतली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यानंतर भारताला जागतिक पातळीवर पहिल्या तीन देशांच्या पंक्तीत आणून ठेवण्याचे अभूतपूर्व काम पंतप्रधान मोदींनी केले असून, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!