*कोंकण एक्स्प्रेस*
*डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला*
*गुन्ह्यात वापरलेली थार कारही परत करण्याचे आदेश*
*ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद*
*कणकवली : प्रतिनिधी*
बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज दुसऱ्यांदा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली थार कारही 20 लाख रुपयांच्या बंद पत्रावर परत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
बेंगलोरचे डॉ. श्रीनिवास रेड्डी यांना गोव्यातील हॉटेलमधून मुंबईला नेण्याच्या बहाण्याने आरोपी मधुसूदन टोकला, व्यंकटेश बाबू व इतरांनी स्विफ्ट गाडीतून नेले होते. प्रवासादरम्यान साळीस्ते येथे गाडीतच त्यांची हत्या करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. या गुन्ह्यात मधुसूदन टोकला, नरसिंह मूर्ति, वर्धन के. एन., सुभाष सुब्बारायापा एस. या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी व्यंकटेश बाबू हा दीर्घकाळ फरार होता. बेंगलोर पोलिसांनी त्याला अन्य एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर कणकवली पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता.
आरोपी व्यंकटेश बाबूला १५ एप्रिल रोजी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तपास अपूर्ण असल्याचे सांगत आणि गुन्ह्यातील महत्त्वाचे दुवे शोधायचे असल्याचे नमूद करत पुन्हा ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने ती फेटाळून आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.
कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्जाद्वारे आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणीत आरोपी व्यंकटेश बाबूच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयाने कणकवली पोलिसांचा रिव्हिजन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पोलिसांच्यावतीने पुन्हा पोलीस कोठडीची मागणी कणकवली न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र कणकवली न्यायालयाने ती मागणी तपासात प्रगती नसल्याच्या कारणास्तव फेटाळली होती. त्याविरुद्ध पुन्हा पोलिसांनी कणकवली न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपीची अधिक तपासा करता पोलीस कोठडी मिळावी म्हणून रिविजन अर्ज दाखल केला होता. तोही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान या गुन्ह्या कमी वापरण्यात आलेली थार कार KA 04 NG 0065 ही सुद्धा फारूक पाशा यांच्याकडे परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदरची कार गुन्ह्यात वापरल्यानंतर च्या कालावधीत फारूक पाशा याला विकलेली होती. ही कार 20 लाख रुपये इतक्या रकमेच्या बंद पत्रावर परत करतानाच अर्जदार यांनी खटल्याचा निकाल लागेपर्यंत ही कार कोणासही हस्तांतरित करू नये अथवा तबदील करू नये. तसेच कारच्या मूळ स्वरूपात बदल करू नये. तपास कामी गरज भासल्यास संबंधित अधिकाऱ्यांसमोर न्यायालयासमोर हजर करावी. कोणत्याही गुन्ह्यांमध्ये याचा वापर करू नये अशा अटी घातल्या आहेत.

