*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड – गावठण मध्ये भर वस्तीत गवा रेडा : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*
*शिरगांव : संतोष साळसकर*
सध्या सिंधुदुर्गात प्रत्येक गावागावातील जंगलामध्ये गवा रेड्याचे वास्तव्य बघायला मिळते. एकवेळ वाघ कुणाला दिसणार नाही पण गवा रेडा मात्र हमखास दृष्टीस पडेल. कधी कधी ते कळपाने दिसायला लागतात.आता काही दिवसात पावसाळा सुरु होईल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला जंगलात लाकूडफाटा किव्हा बागेची साफसफाई करण्यासाठी जावे लागते. अशावेळी हमखास काहीजनांना गवा रेड्यांचे दर्शन मिळते. पण आता हेच गवारेडे भर वस्तीत येऊ लागले. आज रविवारी सकाळी चाफेड गावठण येथे भर वस्तीत गवारेडा आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरगांव दशक्रोशीत असंख्य गवा रेड्यांचे काळप जंगलात वावरताना दिसतात. आज रवि. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास चाफेड गावठण येथील संतोष साळसकर यांच्या घराशेजारील भातशेतीच्या कोपऱ्यात एक भला मोठा गवा रेडा आला. जवळच ‘वाघबीळ’ हे जंगल आहे. याच जंगलातून हा एक गवारेडा भर लोकवस्तीत आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी शिरगांव दशक्रोशीत गवा रेड्याने
एका कातकरी समाजाच्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने तो बचावला. तसेच शिरगांव राकासघाटी जवळ वळणावर एका चारचाकी वाहनाला गवा रेड्याने मोठी धडक दिली होती.
आता पावसाळा सुरु होणार असून शिरगांव दशक्रोशीतील गावे हि घनदाट जंगलात वसलेली असून रात्री अपरात्री दुचाकी वाहनधारकांना आपली वाहने चालवताना जीव मुठीत घेऊन चालवावी लागतात. शिरगांव ते साळशी आणि साळशी ते चाफेड यां रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी असल्यामुळे तसेच धोकादायक वळणे असल्यामुळे समोर अचानक गवा रेडा दिसला कि वाहनधारकांची फारच गैरसोय होते. अशावेळी पुढे जायचे कि मागे जायचे तेच कळतं नाही. कित्येक दुचाकीधारकांना भर रस्त्यात समोर उभा गवा रेडा दिसतो तर काहीवेळा गवा रेड्यांचा काळप रस्ता क्रॉस करताना दिसतो. आशावेळी एकटा वाहनधारक असेल तर त्याची घाबरगुंडी उडते. वन विभागामार्फत शिरगांव परिसरातील अनेक गावात रस्त्यावर गवा रेड्यांच वास्तव्य असल्याचे नामफलक लावण्यात आले आहेत.

