*कोंकण एक्सप्रेस*
*नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत हिंदळे गावच्या सिद्धी चिंबेची चमक; पटकावले रौप्य पदक!*
*देवगड प्रतिनिधी*
नेपाळमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत देवगड तालुक्यातील हिंदळे येथील कु. सिद्धी संगीता मारुती चिंबे हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिद्धीने रौप्य पदक (Silver Medal) पटकावून भारतासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि आपल्या हिंदळे गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
सिद्धीला लहानपणापासूनच कराटे खेळाची प्रचंड आवड होती. हीच आवड जोपासत तिने कठोर मेहनत, नियमित सराव आणि अंगी असलेल्या अदम्य जिद्दीच्या बळावर आज हे आंतरराष्ट्रीय यश संपादन केले आहे. यापूर्वी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. याच दर्जेदार कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय संघात निवड झाली होती.
नेपाळ मधील काठमांडू येथे ही आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील विविध देशांतील कसलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व तगड्या स्पर्धकांचा सामना करत सिद्धीने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले आणि अंतिम फेरीत धडक मारत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. तिच्या या यशामुळे देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.
ग्रामीण भागातील मुलीदेखील क्रीडा क्षेत्रात अथांग मेहनत आणि योग्य संधी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी भरारी घेऊ शकतात, याचे एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण सिद्धीने सर्वांसमोर घालून दिले आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे देवगड आणि हिंदळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्यावर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

