वैभववाडीत शिवसैनिकांचा एल्गार! इंधन दरवाढ आणि टंचाईविरोधात सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

वैभववाडीत शिवसैनिकांचा एल्गार! इंधन दरवाढ आणि टंचाईविरोधात सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडीत शिवसैनिकांचा एल्गार! इंधन दरवाढ आणि टंचाईविरोधात सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन*

*मोदी आणि फडणवीस सरकारविरोधी घोषणांनी वैभववाडी शहर दणाणले; आंतरराष्ट्रीय धोरण चुकल्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसल्याचा सुशांत नाईक यांचा घणाघात*

*कणकवली ः संजना हळदिवे*

केंद्र सरकारकडून सातत्याने होणारी पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि बाजारात निर्माण झालेली इंधनाची कृत्रिम टंचाई याविरोधात आज वैभववाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पायी मोर्चात शिवसैनिकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मोदी व फडणवीस सरकारचा तीव्र निषेध केला. ‘कहा गये अच्छे दिन’, ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणांनी संपूर्ण वैभववाडी शहर दणाणून सोडले होते.

वैभववाडी शाखेपासून नगरपंचायतीपर्यंत पायी मोर्चा

वैभववाडी शिवसेना शाखेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. वैभववाडी चौक ते बाजारपेठ मार्गे वैभववाडी नगरपंचायत पर्यंत शिवसैनिकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन पायी मोर्चा काढला. या आंदोलनाला शिवसैनिकांचा आणि सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पेट्रोल पंपावर विचारला जाब; जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

आंदोलनादरम्यान मोर्चा वैभववाडी शहरातील पेट्रोल पंपावर धडकला. शिवसैनिकांनी इंधन पुरवठ्याबाबत विचारणा केली असता, पंपावरील कर्मचाऱ्यांनी “डिझेल संपले असून पेट्रोलही संपत आले आहे,” अशी कबुली दिली. यावर शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “एकीकडे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत असल्याचे सांगत आहेत, मग प्रत्यक्ष जमिनीवर लोकांना भल्या मोठ्या रांगा का लावाव्या लागत आहेत? आणि इंधन का उपलब्ध नाही?” असा सवाल करत शिवसैनिकांनी प्रशासनाला जाब विचारला.

“मोदी सरकारचे आंतरराष्ट्रीय धोरण सपशेल अपयशी!”

“पेट्रोल-डिझेलचे दर आज ३ रुपयांनी वाढलेत, येत्या काही दिवसांत ते आणखी २० ते ३० रुपयांनी वाढण्याची भीती आहे. रशिया भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देण्यास तयार असूनही, केवळ अमेरिकेच्या दबावामुळे मोदी सरकार ते खरेदी करू शकत नाही. मोदी सरकारचे आंतरराष्ट्रीय धोरण चुकल्यामुळेच आज देशातील सर्वसामान्यांना या महागाईचा फटका सोसावा लागत आहे. रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत असून ते लवकरच १०० पार जाईल, ज्यामुळे सर्वच गोष्टी महाग होतील.”

– सुशांत नाईक (युवासेना जिल्हाप्रमुख)

सरकार जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करत असल्याचा आरोप

इतर पर्याय उपलब्ध असतानाही मोदी आणि फडणवीस सरकार जाणीवपूर्वक इंधनाची टंचाई निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला. सिंधुदुर्गातील वस्तुस्थिती पालकमंत्र्यांच्या दाव्याच्या अगदी उलट असून, जनतेची ही लूट थांबवून इंधन पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, यासाठीच हे आंदोलन छेडण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईचे नगरसेवक रमाकांत रहाटे, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, यशवंत गवाणकर, गुलजार काझी, लक्ष्मण रावराणे, मनोज सावंत, जितेंद्र तळेकर, सुनील पवार, रत्नकांत कदम, दीपक चव्हाण, दत्ताराम राणे, विठोबा गुरव, ओंकार इस्वलकर, अनंत नांदलकर, धाकोजी सुतार, प्रकाश धवटे, चंद्रकांत कोलते, विश्वास शिंदे, शशिकांत तळेकर, संदीप कोलते, सुभाष वळंजू, नितेश मोरे, नारायण गुरव, शिवाजी परब, दिलीप पांचाळ, रमाकांत मोरे, श्री. रावराणे, सुरेश पाळये, रमेश पाटील, मंथन सुतार, सूर्यकांत परब, लवेश शिंदे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!