सिंधुदुर्गच्या विकासासाठी दिल्लीत हक्काची ताकद

सिंधुदुर्गच्या विकासासाठी दिल्लीत हक्काची ताकद

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गच्या विकासासाठी दिल्लीत हक्काची ताकद*

*विनोद तावडे यांच्या सत्काराप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन*

*​कणकवली: संजना हळदिवे*

“माणूस कितीही मोठा झाला, तरी आपल्या मातीची नाळ जोडून ठेवणे किती महत्त्वाचे असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे विनोद तावडे साहेब आहेत. आज ते राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे काम पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांना टीव्हीवर पाहताना आम्हा सिंधुदुर्गवासीयांची मान अभिमानाने उंच होते,” असे गौरवद्गार सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
​भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री आणि नवनियुक्त खासदार विनोद तावडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे, विविध लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
​पक्षाप्रती निष्ठा आणि मोठे मन
​आपल्या भाषणात नितेश राणे यांनी २०१’९ च्या निवडणुकीचा एक आठवण आवर्जून सांगितली. ते म्हणाले, “२०१९ मध्ये जेव्हा राजकीय परिस्थिती वेगळी होती, तेव्हा तिकीट न मिळाल्यास अनेकजण संपर्काबाहेर जातात. मात्र, तावडे साहेबांनी तसे न करता, माझ्या एका फोनवर प्रचाराला येण्याचे मान्य केले. त्यांनी केवळ आशीर्वादच दिला नाही, तर माझ्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हे त्यांच्या मोठ्या मनाचे आणि पक्षनिष्ठेचे दर्शन घडवणारे आहे.”
​कोकणच्या विकासाचा सुवर्णकाळ
​कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, “आज कोकणासाठी हा सुवर्णकाळ आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आपली मोठी ताकद उभी राहिली आहे. नारायण राणे साहेब, विनोद तावडे साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याचे मोठे प्रकल्प आपण कोकणात आणू शकतो.”
​यावेळी त्यांनी प्रलंबित असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा विशेष उल्लेख केला. हा प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्प्यावर असून, तावडे साहेब आणि राणे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे कोकणच्या विकासाची गती आता कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​गावाशी असलेली नाळ कायम
​”तावडे साहेब कितीही व्यस्त असले, तरी गावातील विकासनिधी आणि विकासकामांकडे त्यांचे बारीक लक्ष असते. पालकमंत्री म्हणून माझी नियुक्ती जाहीर झाल्यावर त्यांनी मला फोन करून ‘सिंधुदुर्गचा विकास करायचा आहे, चांगले काम कर’ असा सल्ला दिला होता,” असे सांगत नितेश राणे यांनी तावडे यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!